तरुणाईला मिळणार जैवविविधता नोंदींचे प्रशिक्षण

रोजगाराचीही संधी : बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीतर्फे आयोजन

पुणे – राज्यातील तरुणाईला जैवविविधतेचे महत्व कळावे, विविध गावांमधील जैवविविधतेच्या नोंदी घेतल्या जाव्यात तसेच या माध्यमातून तरुणाईमधील कलागुणांचा विकास होऊन त्यांना रोजगाराची एक वेगळी संधी निर्माण व्हावी, या उद्देशांनी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीतर्फे (बीनएचएस) जैवविविधता नोंदवही व कायदा प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सुमारे महिनाभर चालणाऱ्या या कार्यशाळेअंतर्गत राज्यातील तरूणांना जैवविविधतेविषयक माहिती आणि त्याच्या नोंदी घेण्याच्या पद्धती अभ्यासता येणार आहेत.

केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या सहयोगाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जैवविविधतेबाबत सविस्तरपणे प्रशिक्षण देणारी ही राज्यातील पहिलीच कार्यशाळा आहे. विशेष म्हणजे राज्यातील कोणीही युवक ज्याची किमान शैक्षणिक पात्रता 10 वी अथवा 12 वी पास असेल व त्यास पर्यावरण विषयात काम करायची तीव्र इच्छा असेल, तो यामध्ये सहभागी होऊ शकतो. “बीनएचएस’ तर्फे डॉ. गिरीश जठार यांनी सांगितले आहे.

डॉ. जठार म्हणाले, “बीएनएचएस आणि महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाच्या सहकार्याने महिनाभराच्या कालावधीसाठी प्रामुख्याने जैव विविधता नोंदवही कशी करावी, कायद्यातील सर्व प्रकारच्या तरतुदी, कायदा अंमलबजावणी कशी करावी व सर्वांत महत्त्वाचे त्याचा स्थानिक ठिकाणी ग्राम विकासासाठी कसा उपयोग करून घ्यावा या संदर्भात निवासी प्रशिक्षण कार्यशाळा 12 जुलै ते 11 ऑगस्ट 2019 या दरम्यान घेण्यात येणार आहे. एकंदरीत प्रशिक्षण केवळ जैवविविधता कायद्यापुरते मर्यादित राहणार नाही, तर तिचे संरक्षण व संवर्धनसंदर्भात अन्य बऱ्याच काही संबंधित बाबी प्रात्यक्षिकासह शिकविल्या जाणार आहेत. विविध गावांमध्ये जैवविविधतेचे संवर्धन करणारे कार्यकर्ते घडतील,’ असा विश्‍वास डॉ. जठार यांनी व्यक्त केला आहे.

संपूर्णपणे मोफत प्रशिक्षण
प्रशिक्षण कार्यशाळा संपूर्ण निवासी आहे. याकरिता कोणत्याही प्रकारची फी किंवा शुल्क नाही. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर कार्यशाळेच्या शेवटी सर्वांना केंद्रीय पर्यावरण विभागाच्या वतीने प्रमाणपत्र दिले जाणार आहे. हे प्रशिक्षण ठाण्यातील शहापूर येथील फॉरेस्ट गार्ड ट्रेनिंग ऍकॅडमी येथे होणार आहे. जैवविविधता संवर्धन व संरक्षण विषयात काम करण्याची, भविष्यात नेचर गाइड म्हणून काम करायची इच्छा असणाऱ्यांसाठी ही कार्यशाळा एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.