चांद्रयान मोहीम-2 जागर स्त्रीशक्तीचा

संशोधन क्षेत्राकडे विद्यार्थ्यांचा म्हणावा तसा ओढा असताना दिसत नाही. मात्र, या क्षेत्रातही खूप साऱ्या संधी उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे, या माध्यमातून आपल्याला देशासाठी योगदान देता येते. भारताची चांद्रयान -1 ही मोहीम 2008 साली यशस्वीपणे पूर्ण झाली. आता तब्बल दहा वर्षांनी पुन्हा आपण चांद्रयान 2 ही मोहीम राबवीत आहोत. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) पुन्हा चंद्रावर आपलं यान पाठवणार असल्याची घोषणा केली आहे. ही नक्कीच भारतीय संशोधकांच्या दृष्टीने आनंदाची बातमी आहे. या मोहिमेचे विशेष म्हणजे याचे नेतृत्व दोन कर्तृत्ववान महिला शास्त्रज्ञ करीत आहेत.

रितू करिधल या संपूर्ण मिशनच्या संचालक आहेत तर एम. वनिता या प्रकल्प संचालक म्हणून या मोहिमेसाठी आपले योगदान देत आहेत. चांद्रयान – 2 हे यान 15 जुलैला सकाळी 2.51 वाजता आंध्रप्रदेशच्या श्रीहरीकोटा येथून प्रक्षेपित केलं जाईल. जगातील इतर देशांच्या मोहिमेसाठी लागणारे पैसे आणि आपल्या मोहिमांसाठी लागणारे पैसे यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात तफावत आहे. आपल्याकडे अत्यंत कमी पैशांमध्ये दर्जात्मक मोहीमा होतात.

इस्रोचे अध्यक्ष डॉ. के. सिवन यांनी चांद्रयान- 2 च्या माहितीसाठी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले की, आम्ही महिला आणि पुरुष यांच्यात काहीही भेदभाव करत नाहीत. इस्रोमध्ये आज जवळपास 30% महिला काम करीत आहेत. याआधी महिला वैज्ञानिकांचा सहभाग विविध मोहिमांमध्ये होता मात्र, यावेळी भारताच्या इतिहासामधे पहिल्यांदा महिला अशा मोहिमेचे नेतृत्व करीत आहेत. यामध्ये रितू यांनी मंगळ मोहिमेमध्येही आपले महत्त्वपूर्ण योगदान दिलेले होते.

रितू यांची ओळख रॉकेट वूमन ऑफ इंडिया अशी आहे. एरो स्पेस या शाखेमध्ये त्यांनी आपले अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या कामगिरीची दखल घेत माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते इस्रो यंग सायंटिस्ट हा पुरस्कार मिळालेला आहे. त्यांना लहानपणापासून विज्ञानाची आवड होती. ती आवड जपत त्यांनी आपले पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. नंतर त्यांनी इस्रोमध्ये वैज्ञानिक म्हणून आपल्या कामास सुरूवात केली. मुलींना त्यांच्या शिक्षणासाठी आई वडिलांनी प्रोत्साहन दिले पाहिजे. दोन दशकांपूर्वी माझ्या पालकांनी मला ते दिले त्यामुळे मी इथपर्यंतचा प्रवास करू शकले.

पालकांनी आपल्या मुलींना पाठींबा देत, त्यांना शिक्षणासाठी निर्णयाचे स्वातंत्र्य दिले पाहिजे, असेही त्यांचे मत आहे. एम वनिता या चांद्रयान – 2 मोहिमेत प्रकल्प संचालक म्हणून काम करीत आहेत. वनिता यांनी डिझाईन अभियांत्रिकीमध्ये आपली पदवी पूर्ण केली आहे. त्यांना ऍस्ट्रोनॉमिकल सोसायटी ऑफ इंडिया यांच्याकडून बेस्ट वुमन सायंटिस्ट हे पारितोषिक मिळाले आहे. त्यांनी अनेक वर्ष उपग्रहांवर काम केलेले आहे. या मोहिमेच्या माध्यमातून चंद्रावरील पाणी, संशोधन आणि खनिजांचा शोध घेतला जाणार आहे. महिला सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत आज सन्मानाने सर्व क्षेत्रांमध्ये वावरत आहेत. प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला पुरूषाच्या खांद्याला खांदा लावून कार्यरत आहेत. असे म्हणतात

A woman is like a tea bag
you can’t tell how strong she is
until you put her in hot water.

त्या नक्की आपल्या क्षमतेला न्याय देतात. चांद्रयान मोहिमेच्या यशस्वितेसाठी मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा.

– श्रीकांत येरूळे

Leave A Reply

Your email address will not be published.