#CWC19 : विश्वचषकात आज ‘दक्षिणआफ्रिका-न्यूझीलंड’ आमनेसामने

अपराजित्व टिकविण्याचे न्यूझीलंडचे ध्येय

स्थळ : एजबॅस्टन, बर्मिंगहॅम
वेळ : दु. 3 वा.

बर्मिंगहॅम – दक्षिण आफ्रिकेचे 2015 चा विश्‍वचषक जिंकण्याचे स्वप्न उपांत्य फेरीत न्यूझीलंडने धुळीस मिळविले होते. या पराभवाची परतफेड करण्यासाठी आफ्रिकेचे खेळाडू कसोशीने प्रयत्न करतील अशी अपेक्षा आहे. या
स्पर्धेत अद्यापही अपराजित्व राखणारा न्यूझीलंडचा संघ हा सामना जिंकून बाद फेरीसाठी एक पाऊल पुढे टाकण्यासाठी उत्सुक आहे.

केन विल्यमसन याच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडने येथे सर्वच आघाड्यांवर सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. त्याने केलेल्या शानदार फलंदाजीमुळेच त्याच्या संघास बांगलादेश व अफगाणिस्तानविरुद्ध विजय मिळविता आला होता. रॉस टेलर, कॉलिन मुन्रो, मार्टिन गुप्टील यांच्यावरही त्यांच्या फलंदाजीची मदार आहे. कॉलिन डी ग्रॅंडहोम व जेम्स नीशाम हे धोकादायक अष्टपैलू खेळाडू मानले जातात. भारताबरोबरचा न्यूझीलंडचा सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यानंतर त्यांच्या खेळाडूंना कुटुंबीयांसमवेत आनंद घेण्याची संधी मिळाली होती. साहजिकच त्यांचे खेळाडू ताजेतवाने झाले आहेत व त्याचा त्यांना फायदा मिळेल अशी अपेक्षा आहे.

या तुलनेत आफ्रिकेपुढे समस्यांचा डोंगरचा उभा आहे. त्यांना येथे पहिल्या तीन सामन्यामध्ये पराभव पत्करावा लागला आहे. अफगाणिस्तान या कमकुवत संघावर मात करीत त्यांनी विजयाचा श्रीगणेशा केला आहे. डेल स्टेन या भेदक गोलंदाजास दुखापत झाल्यामुळे त्याची अनुपस्थिती त्यांना प्रकर्षाने जाणविणार आहे. फिरकी गोलंदाजांविरुद्ध त्यांची कामगिरी फारशी समाधानकारक नसेल. हे लक्षात घेऊनच न्यूझीलंडकडून ईश सोधी या भारतीय वंशाच्या फिरकी गोलंदाजास संधी मिळण्याची शक्‍यता आहे.

प्रतिस्पर्धी संघ

न्यूझीलंड – केन विल्यमसन (कर्णधार), रॉस टेलर, टॉम लॅथम, कॉलिन डी ग्रॅंडहोम, टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), ट्रेंट बोल्ट, लॉकी फर्ग्युसन, मार्टिन गप्तील, मॅट हेन्री, कॉलिन मुन्रो, जेम्स नीशाम, हेन्री निकोल्स, मिचेल सॅंटनर, इश सोधी, टीम साऊदी.

दक्षिण अफ्रिका – फाफ ड्यु प्लेसिस (कर्णधार), एडन मरक्रम, हशीम अमला, डेव्हिड मिलर, जेपी ड्युमिनी, अँडिले फेलुकवायो, डेल स्टेन, कागिसो रबाडा, लुंगी एन्गिडी, ख्रिस मॉरिस, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), इम्रान ताहीर, ड्‌वेन प्रिटोरस, तबरेझ शम्सी, रसी व्हॅन डर दुसे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.