तमाशा कलावंतावरील हल्ल्याचा नारायणगावात निषेध

नारायणगाव-अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्‍यात टाकळी लोणार येथे हरिभाऊ बढेसह शिवकन्या बढे या तमाशा मंडळावर 25 एप्रिल रोजी गावातील गुंडांनी भ्याड हल्ला केला. याच्या निषेधार्थ नारायणगाव तमाशा पंढरीत आयोजित सभेत तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला.

या हल्ल्यामुळे तमाशा कलावंतांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ही घटना घडल्यानंतर नारायणगाव येथील तमाशा पंढरीतील तमाशा फडमालक संभाजीराजे जाधव यांनी काही फडमालक व व्यवस्थापकांसह तात्काळ घटनास्थळी भेट दिली. आरोपींना जोपर्यंत अटक होत नाही, तोपर्यंत त्या गावात कोणीही तमाशा करणार नसल्याचे सांगितले. ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज (दि. 2) नारायणगाव तमाशा पंढरीत पत्रकार परिषद घेऊन निषेध सभा घेण्यात आली. यावेळी संभाजीराजे जाधव, काशिनाथ आल्हाट, खंडूराज गायकवाड, अख्तर शेख, किशोर चौरे, शांताराम वाणी, नवघरे मॅनेजर, दत्ता जाधव आदी तमाशा कलाकार व व्यवस्थापक उपस्थित होते.

या हल्ल्यातील मुख्य आरोपी अद्यापही फरार असून जोपर्यंत मुख्य आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत आम्ही राज्यभर कलावंतांच्या माध्यमातून या घटनेचा निषेध करत राहणार आहोत. समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम असलेल्या तमाशा कलावंतांवर असे हल्ले होत राहिले तर तमाशा ही लोककला जिवंत राहिल की नाही, अशी चिंता देखील खेडकर यांनी व्यक्त केली. तमाशा क्षेत्रातील अनेक अडचणींवर भाष्य करत सर्व फड मालकांनी संघटित होणे गरजेचे आहे. तमाशा संघटनेतील आत्ताच्या तरुण पदाधिकाऱ्यांनी ज्येष्ठ तमाशा कलावंत व फडमालकांबरोबर सुसंवाद साधून अशा घटना घडू नयेत, म्हणून योग्य उपाययोजना करावी असेही खेडकर म्हणाले. यावेळी तमाशाचे अभ्यासक काशिनाथ आल्हाट यांनी तमाशा कलेच्या माध्यमातून जनजागृती व लोकप्रबोधन होत असल्याचे सांगून असे भ्याड हल्ले होत असतील तर तमाशाकला टिकणार की नाही अशी चिंता व्यक्त करीत या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.