जेईई मेन्सचा “कटऑफ’ वाढला

 जानेवारीचा निकाल वरचढ

प्रभात वृत्तसेवा
पुणे – देशातील अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेली जेईई-मेन्स परीक्षा वर्षातून दोन वेळा घेण्यास यंदापासून सुरुवात झाली असून, त्याचा निकाल जाहीर झाला. या दोन्ही परीक्षांच्या निकालावरून जानेवारीतील परीक्षेमध्येच विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळविल्याचे स्पष्ट होत आहे. त्याचाच परिणाम म्हणून यावर्षी जेईई मेन्स परीक्षेचे कटऑफ वाढल्याचे दिसून येत आहे.

आयआयटी, एनआयटी, अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रवेशासाठी जेईई मेन्स परीक्षा महत्त्वाची आहे. या परीक्षा वर्षातून दोन वेळा घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार यंदा अंमलबजावणी करण्यात आली. हा निर्णय विद्यार्थ्यांना फायदेशीर ठरत आहे. जेईई मेन परीक्षा यावर्षीपासून नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत घेण्यात येत आहे. यंदा प्रथमच पर्सेंटाईलनुसार निकाल जाहीर करण्यात आले.

देशातील 24 विद्यार्थ्यांना 100 पर्सेंटाईल गुण मिळाले असून अंकीत कुमार मिश्रा, कार्तिकेय गुप्ता आणि पुण्यातील राज अगरवाल हे तीन विद्यार्थी महाराष्ट्रातील आहेत. तिघांनीही जानेवारी महिन्यातील परीक्षा दिली होती. जानेवारीमधील परीक्षेत राज अगरवाल प्रथम आला होता. दोन्ही परीक्षेतील एकत्रित गुणांच्या आधारे अंकीतने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. दोन्ही परीक्षा दिलेल्या 2 लाख 97 हजार विद्यार्थ्यांचे एप्रिल महिन्यातील परीक्षेत गुण वाढले आहेत.

आयआयटीन्स प्रशिक्षण केंद्राचे संचालक प्रा. दुर्गेश मंगेशकर म्हणाले, “इयत्ता बारावीचे विद्यार्थी आधीपासूनच जेईईची तयारी करत असतात. त्यामुळे बारावीच्या परीक्षेपूर्वी जेईई देणे सोपे जाते. त्यानंतर फेब्रुवारी व मार्चमध्ये अंतिम परीक्षेमुळे जेईईच्या अभ्यासात खंड पडतो. ही परीक्षा झाल्यानंतर पुन्हा एप्रिल महिन्यातील परीक्षेची तयारी करण्यात पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे जानेवारीमध्येच अनेक विद्यार्थ्यांना चांगल्या गुणांसाठी प्रयत्न केल्याचे निकालावरून दिसते.’

 
गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत या वर्षी जेईई मेन्सचा वाढला आहे. 2018 मध्ये 74 आणि 2017 मध्ये 81 कटऑफ होता. प्रश्‍नपत्रिका सोप्या असल्याने विद्यार्थ्यांचे गुण वाढले. या वेळेसचा कटऑफ 2016 मधील कटऑफप्रमाणे म्हणजेच 100 इतका आहे. महत्त्वाची बाब म्हणजे परीक्षा आणि निकाल ही प्रक्रिया वेळेत पार पडली. जेईई मेन्समधील बदल यशस्वी झाल्याने आता त्याच धर्तीवर “नीट’ परीक्षेची कार्यपद्धतीही निश्‍चित करायला हरकत नाही.
– प्रा. दुर्गेश मंगेशकर, संचालक आयआयटीन्स प्रशिक्षण केंद्र

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.