जुन्नर तालुक्‍यातील बोरी बुद्रुक गाव ठरणार आदर्श

नारायणगाव – ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव आणि महाराष्ट्र शासन कृषी विभाग, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने बोरी बुद्रुक (ता. जुन्नर) या गावाची आदर्श जमीन आरोग्य पत्रिका अभियान, 2019-20 मध्ये निवड करण्यात आलेली आहे.

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टीने सरकारचे प्रयत्न सुरू असून, या योजनेचाच भाग म्हणून जमिनीची आरोग्य तपासणी व त्यानुसार खत व्यवस्थापन करणे महत्त्वाचे ठरले आहे. त्या दृष्टीने या जमीन आरोग्य व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत बोरी बुद्रूक या गावातील 1551 माती नमुने तपासणी करण्यासाठी घेण्यात येणार आहेत. या तपासणीमुळे शेतकऱ्यांना जमिनीचे आरोग्य आबाधित राखण्याच्या दृष्टीने कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव यांच्या मार्फत मार्गदर्शन होणार आहे.

कृषी विज्ञान केंद्राचे मृदाशास्त्रज्ञ योगेश यादव यांनी माती नमूना गोळा करण्याचे प्रात्यक्षिक दाखवून दादाभाऊ वाजे यांच्या शेतावर माती नमूना कसा, कधी, घ्यावा या विषयीचे मार्गदर्शन केले. यावेळी गावाच्या सरपंच पुष्पा कोरडे, दादाभाऊ वाजे, गणेश वाजे, शरद पिंगळे, अशोक वाजे, दिगंबर शिंदे, संपत कोरडे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन गावचे प्रगतशील शेतकरी अमोल कोरडे, कृषी सहाय्यक सुजाता पंधे यांनी केले.

बोरी बुद्रुक (ता. जन्नर) हे गाव एक आदर्श गाव ठरणार असून, जमिनीमध्ये होत चाललेल्या बदलांमुळे तिचे आरोग्य सुधारण्यासाठी जमिनीचे कर्ब, विद्युत वाहकता, सामु, तसेच मुख्य व दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची तपासणी करण्यात येणार आहे. यामुळे खत व्यस्थापनासाठी एक प्रकारे चांगली मदतच होणार असून याची सुरुवात बोरी बुद्रूक गावातील वाजे व शिंदे मळ्यापासून करण्यात आलेली आहे. यासाठी माती नमूना गोळा करण्याचे काम ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव यांच्या मार्गदशनाखाली सुरू करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सर्व शेतकऱ्यांनी सहभाग घेऊन आपल्या जमिनीचे आरोग्य तपासून घ्यावे.
– योगेश यादव, मृदाशास्त्रज्ञ, ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.