शिवरी येथील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट
खळद- शिवरी (ता. पुरंदर) येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या शाखेतील ऑनलाइन सेवा गेल्या दहा दिवसांपासून बंद असल्यामुळे येथील सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे खातेदारांमध्ये प्रचंड संतापाची लाट पसरली आहे. खातेदारांनी लवकरात लवकर सुरू व्यवहार सुरळीत करण्याची मागणी केली आहे.
शिवरी हे गाव सासवड-जेजुरी पालखी महामार्गालगत असून या शाखेच्या परिसरात शिवरी बरोबरच खळद, वाळुंज, निळुंज, तक्रारवाडी, भाटमळवाडी आदी गावे येतात. या गावामध्ये असणाऱ्या विविध कार्यकारी सेवा सोसायटी, परिसरातील अनेक दूध संस्थांचे आर्थिक व्यवहार, महाविद्यालय, खासगी शाळा, मंगल कार्यालय, दवाखाना, कृषी सेवा केंद्र, खाजगी कंपन्या, शासनाच्या विविध लाभाचे अनुदान, उसाची बिलांचे व्यवहार या बॅंकेतून होतात. पण सध्या दहा दिवसांपासून शिवरी बॅंकेचे व्यवहार ठप्प असल्यामुळे नागरिकांना अडचणी येत आहेत.
याबाबत बॅंकेतून मिळालेल्या माहितीनुसार बॅंकेला बीएसएनएल कंपनीची इंटरनेट सुविधा आहे. मात्र, बीएसएनएल कंपनीने विजेचे बिल भरले नसल्याने त्यांचे कनेक्शन बंद केले आहे. यामुळे बॅंकेची ऑनलाईन सेवा बंद आहे. याबाबत त्यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे. मात्र, अद्यापपर्यंत काहीही झाले नसल्याचे सांगितले. यामुळे बॅंकेतील व्यवहार कधी सुरू होतील याबाबत अनिश्चितता आहे.
सध्या पावसाने थोडी उघडीप दिल्याने शेतातील कामांना वेग आला आहे. शेतकऱ्यांना औषधे व बियाणांची खरेदी, शेतातील मजुरी यासाठी पैसे लागतात, परंतु बॅंकेतून पैसे मिळत नसल्याने याचा परिणाम शेतातील कामांवर होत आहे.