पिंपरी : ‘हाफकिन’च्या औषधांना ‘येमेन’मधून मागणी

पुरवठा करण्याची कार्यवाही सुरू

पिंपरी – पश्‍चिम आशिया मधील येमेन या देशातून हाफकिन जीवऔषध निर्माण महामंडळाच्या विविध जीवरक्षक औषधांना मागणी प्राप्त झाली आहे. ही औषधे तयार असून येमेनला पुरवठा करण्याची कार्यवाही सुरु आहे.

हाफकिन महामंडळ ही भारतातील प्रतिविष, रक्तजल आणि सर्पदंश प्रतिरोधक औषधे उत्पादन करणारी अग्रगण्य संस्था आहे. या संस्थेचे पिंपरी येथे मोठे उत्पादन केंद्र आहे. या संस्थेत एक हजार घोडे आणि अश्‍ववर्गीय प्राण्यांच्या सहाय्याने सर्पदंश, विंचूदंश, श्‍वानदंश प्रतिविष, तसेच प्रतिधनुर्वात लसी तयार केल्या जातात. या औषधांच्या उत्पादन निर्मितीबद्दल माहिती घेण्यासाठी “येमेन’च्या प्रतिनिधी मंडळाने संस्थेच्या पिंपरी विभागाला नुकतीच भेट दिली होती. येथे उत्पादित औषधे “येमेन’ ला उपयुक्त ठरू शकतात, अशी खात्री या प्रतिनिधी मंडळाला पटली.

त्यानंतर त्यांनी हाफकिन महामंडळाला विविध जीवरक्षक औषधांचा पुरवठा करण्याची मागणी नोंदविली. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेश देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्पदंशासाठी तीन हजार कुप्या, विंचूदंशावरील एक हजार, श्‍वानदंशाच्या पाच हजार, तर प्रतिधनुर्वाच्या दहा हजार लसींची मागणी महामंडळाला आली आहे. त्यांच्या पुरवठ्याची कार्यवाही सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.