खेड घाटात वाहनांच्या रांगा

दोन कंटेनर बंद, तर ट्रकचा अपघात झाल्याने वाहतूक कोंडी

राजगुरूनगर – पुणे-नाशिक महामार्गावर खेड घाटात वाहने बंद पडल्याने बुधवारी (दि. 5) सकाळी वाहतूक कोंडी झाली. सुमारे दोन किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्या. तर घाटामध्ये दोन-दोन तास अडकून राहण्याची वेळ प्रवाशांवर आली.
खेड घाटामध्ये वरच्या बाजूने दुसऱ्या वळणावर आज पहाटे 5 वाजता एक ट्रक कलंडला. त्याबाजूला खोल दरी आहे; पण बाजूच्याच पत्र्याच्या कठड्याला ट्रक अडकल्याने मोठी दुर्घटना टळली. त्यानंतर सकाळीच एका कंटेनरच्या ऍक्‍सलचा रॉड तुटल्याने तो वरच्या बाजूच्या पहिल्या वळणावर बंद पडला. तसेच, एक कंटेनर चौथ्या वळणावर पंक्‍चर झाला. त्यामुळे नऊ- दहा वाजता कोंडी व्हायला सुरुवात झाली. मध्येच अडकलेल्या प्रवाशांची अवस्था “ना घर का सिर्फ घाट का’ अशी झाली. त्यांना पुढेही सरकता येईना आणि मागेही जाता येईना. त्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या. वाहतूक पोलिसांनी क्रेन मागवून मोठ्या शिकस्तीने बंद पडलेली वाहने बाजूला करून घाट मोकळा केला. साधारण बारा वाजण्याच्या सुमारास वाहतूक सुरळीत झाली.
खेड बाह्यवळण घाटाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या महिनाअखेर घाटाचे काम पूर्ण होणार असून वाहतूक सुरळीत होणार आहे. मात्र तोपर्यंत प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. जुन्या घाट रस्त्यावर पावसाळ्यात अनेकदा दरडी कोसळण्याचे प्रकार घडत आहेत. पाऊस जास्त झाल्यास हा धोका कायम असून वाहन चालकांनी घाटातून प्रवास करताना काळजी घ्यावी, असे आवाहन महामार्ग पोलिसांनी केले आहे

Leave A Reply

Your email address will not be published.