एसपी हाकेवर, तर डीवायएसपी कोसावर!

पौड पोलीस ठाणे हवेली उपविभागाला जोडल्याने मुळशीकरांची पायपीट वाढणार

– प्रवीण सातव

पिरंगुट – पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या निर्मितीनंतर पौड पोलीस ठाणे हवेली उपविभागाला जोडले गेले. यामुळे मुळशी तालुक्‍यातील नागरिकांची गैरसोय झाली आहे. मुळशीकरांसाठी पोलीस अधीक्षक कार्यालय पौड पोलीस ठाण्यापासून 27 किलोमीटर तर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय 52 किलोमीटर अंतरावर गेले आहे. यामुळे नागरिकांच्या त्रासात अधिकच भर पडत आहे.

पौड पोलीस ठाणे हवेली उपविभागाला जोडले आहे. गेल्या काही दिवसांपासून कारभारही सुरू झाला आहे. मात्र, हे कार्यालय हवेलीमधील लोणी काळभोर याठिकाणी असल्याने मुळशी तालुक्‍यातील नागरिकांची गैरसोय झाली आहे. त्यामुळे उपविभागीय कार्यालय सोयीच्या ठिकाणी घ्यावे, अशी मागणी समस्त मुळशीकर नागरिक करीत आहे. पुणे व पिंपरी चिंचवड शहरालगत असलेला तालुका म्हणजे मुळशी होय. तालुक्‍याचा झपाट्याने सर्वांगीण विकास होत आहे. तालुक्‍याचे ठिकाण असलेल्या पौड येथे पोलीस ठाणे आहे. तर पिरंगुट येथे मदतकेंद्र आहे. या आधी पौड पोलीस ठाणे देहूरोड उपविभागीय कार्यालयाशी जोडले होते. मात्र, देहूरोड व मावळ तालुक्‍यातील अनेक भाग नव्याने झालेल्या पिंपरी-चिंचवड आयुक्‍तालयाशी जोडला गेला. यात देहूरोड उपविभागीय कार्यालयाशी जोडलेल्यां ठाण्यामध्ये केवळ पौड पोलीस ठाणे राहिले असून उर्वरित भाग पिंपरी-चिंचवड आयुक्‍तालयाशी जोडला आहे.

नव्याने विकसीत झालेल्या पिंपरी आयुक्‍तालयात उपविभागीय पोलीस अधिकारी गणपतराव माडगूळकर यांची अतिरिक्‍त पोलीस आयुक्‍तपदी बढती झाली आहे. त्यामुळे नोव्हेंबरपासून पौड पोलीस ठाणे हवेली उपविभागाला जोडले आहे. अनेक कामांसाठी नागरिकांना पोलीस ठाण्यात यावे लागते. कधी कधी काही कामानिमित्त उपविभागीय कार्यालयात जावे लागत आहे. माहिती अधिकार, उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांशी भेट घेणे, शस्त्र परवाना मिळवणे, दाखल झालेल्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी तसेच जमिनींची मोजणी करतेवेळी लागणारा बंदोबस्त आदींसाठी उपविभागीय कार्यालयात संपर्क करावा लागतो.

पुणे शहर घालावे लागते पालथे
मुळशी तालुक्‍यात सहारा सिटी, लवासा सिटी आहेत. तसेच अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शैक्षणिक संस्था आहेत. याठिकाणी अनेकदा व्हीव्हीआयपींची वर्दळ असते. तसेच सहारा सिटी असो लवासा येथे आंदोलने होत असतात. अशावेळी अतिरिक्‍त पोलीस बंदोबस्त मागवावा लागतो. देहूरोड कार्यालय जवळ असल्याने बंदोबस्त तात्काळ मिळत होता. तसेच हे कार्यालय मुळशीकरांच्या दृष्टीने सोयीचे होते; मात्र आता हे कार्यालय हवेली तालुक्‍यातील लोणी काळभोर येथे गेल्याने नागरिकांना गैरसोय झाली आहे. या ठिकाणी जायचे झाल्यास पुणे शहर पालथे घालून जावे लागणार आहे. त्याच सर्वत्र वाहतूककोंडी असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे.

पौड पोलीस ठाणे हे हवेली उपविभागीय कार्यालयास जोडले आहे. नागरिकांच्या असणाऱ्या तक्रारी व अडीअडचणी या पोलीस ठाण्यातच दूर केल्या जात आहेत. पोलीस ठाण्यामधील अधिकारी नागरिकांना सर्वोतोपरी सहकार्य करीत आहे. आठवड्यातून एक दिवस मी स्वतः येथे येत असल्याने नागरिकांची कोणतीही अडचण होत नाही. पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारींचे योग्य ते निरसन करण्यास सांगितले आहे.
– डॉ. सई भोरे-पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, हवेली

Leave A Reply

Your email address will not be published.