अज्ञाताने मिरचीची पाचशे रोपे उपटली

उंचखडक येथील शेतकऱ्याचे नुकसान : आळेफाटा पोलिसांत गुन्हा दाखल

बेल्हे – अज्ञात इसमाने उंचखडक येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील मिरचीची पाचशे रोपे उपटून नुकसान केल्याची घटना गुरुवारी (दि. 6) सकाळी उघडकीस आली. याबाबत आळेफाटा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत आळेफाटा पोलीस ठाण्याच्या पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उंचखडक (ता. जुन्नर) येथील ज्ञानदेव यशवंत कणसे यांनी त्यांच्या शेतात सुमारे सातशे मिरचीची रोपे लावली होती. गुरुवारी (दि. 6) सकाळी ते नेहमीप्रमाणे मिरच्यांना पाणी देण्यासाठी आपल्या शेताकडे गेले. त्यावेळी त्यांना शेतातील सातशे मिरचीच्या रोपांपैकी पाचशे रोपे उपटून टाकल्याचे दिसले. सध्याच्या बाजारभावानुसार या शेतकऱ्याचे एक लाखाहून अधिक रुपयांचे नुकसान अज्ञात व्यक्तीने केले असल्याचे दिसून आल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून आळेफाटा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तिविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान गतवर्षी याच शेतकऱ्याच्या शेतात भुईमूगाचे पीक होते. त्याही पिकातील भुईमुगाच्या शेंगा उपटून नासाडी केल्याने या शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले होते. या शेतकऱ्याने त्याही वेळेस आळेफाटा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुध्द तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुरुवारी (दि. 6) पुन्हा त्याच शेतकऱ्याची नासधूस करून आर्थिक नुकसान केल्याची घटना घडली आहे.

सध्या दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर या शेतकऱ्याने टॅंकरने पाणी विकत घेऊन हे पीक जगवले होते. मात्र अज्ञात व्यक्तीच्या खोडसाळपणामुळे या शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झालेले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.