युवराज : एक क्रिकेट पर्व…

तो लहानपणीचा काळ, क्रिकेट म्हणजे एक बॉल, काही लाकडी बांबू आणि काही तरुण! अचानक आत्ता फेसबुकवर दणादण पोस्ट पडू लागल्या, त्यात ‘MISS YOU YUVRAJ’ वगैरे वगैरे… मुळात तर धक्काच बसला, कारण समजले की क्रिकेटपटू युवराज सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होतोय. खरच काही माणसं अशी असतात की ती थांबली की खुप काही थांबले असल्याची जाणीव होते, त्यातलाच हा एक युवराज!

ज्याच्या नावातच युवराज आहे असा आपला विशेष माझा लाडका युवराज आज निवृत्त झालाय. खुप काही शिकायला मिळाले याच्या झुंझारू वृत्तीने, मैदान असो अथवा नसो युवराज हा नेहमीच एक वेगळेपण असलेला माणूस. माझे फेसबुक अकाउंट बंद झाल्याने मी लिखाण सुद्धा थांबवले होते, पण वाटलं आज लिहिलेच पाहिजे, कारण युवराज थांबतोय…

आज अचानक बालपण आठवलं, आमच्याकडे त्या काळी सुद्धा ‘ब्लॅक अँड व्हाईट’ टिव्ही होता, गावातील बरीच मुलं टिव्हीवर मॅच (सामना) पहायला यायची. मला तसे क्रिकेट आवडत नव्हते, पण आमच्या घरी आलेली मुलं एखादा प्रतिस्पर्धी खेळाडू बाद झाला असता, आपल्या एखाद्या खेळाडूने चौकार/षटकार ठोकला असता टाळ्या वाजवून आनंद साजरा करायची. मी सुद्धा टिव्ही समोर पण मला काही कळत नव्हते मग मी पोरांना विचारायचो, “काय झालं”? यावर उत्तर मिळायचं, “विकेट पडली, चौका (चौकार) गेला” वगैरे वगैरे…

त्यातच कधी कधी “छक्का गेला” असा आवाज यायचा, ‘छक्का’ म्हणजे सर्वसाधारणपणे खेड्यातील लोकांना वाटायचं ‘तृतीयपंथी’, म्हणून कधी कधी क्रिकेट न आवडणारी वृद्ध मंडळी उद्विग्न होऊन म्हणायची” कार्टी काय लावून बघत बसतात की कुठं छक्का गेला न्‌ कुठं चौका गेला, देवा धर्माचं काही लावायचं कसलं क्रिकेट बघत बसत्यात की!”

हळूहळू मलाही क्रिकेटची गोडी लागली, लाकडी बॅट (गावातील सुतारमामाकडून एखाद्या लाकडी फळीची 50-60 रुपये देवून बनवून घेतलेली) यावर दिवसभर तर कधी शाळेला दांडी मारून तर कधी आजारी पडल्याचे नाटक करुन उन, वाऱ्या पावसाची चिंता न करता क्रिकेट खेळायचो.

पुढे चालून माझा मित्र गावच्या क्रिकेट टीमचा कॅप्टन (संघनायक) झाला, बऱ्याच वेळा इतर गावातील ‘टुर्नामेंट’ मधे भाग घेतला, विजय हा आमच्या नशिबी तसा फारच कमी असायचा, आणि हो, आमच्या गावाशेजारी असलेल्या रेटवडी बरोबर मात्र आम्ही बऱ्यापैकी जिंकायचो, रेटवडीची टिम म्हणजे आमची कट्टर प्रतिस्पर्धी अगदी भारत आणि पाकिस्तानचा सामना. टुर्नामेंट हरलो तरी चालेल पण रेटवडी सोबत हारायचे नाही हा आमचा निश्‍चय!

काळ बदलला तसे राहणीमान सुद्धा बदलले, घरोघरी टिव्ही आला तो वेगवेगळ्या स्वरूपात. मात्र क्रिकेटची मजा काही कमी झाली नाही. मागील चार – पाच वर्षांत मी व्यस्त असल्याने क्रिकेट पाहणे खुप कमी केले. पण विश्‍वचषक स्पर्धा सुरू झाली वेळ काढून सामने बघत आहे. भारतीय टीमच्या खेळाचा उंचावलेला स्तर पाहून खूप समाधान वाटते, फक्त चेहरे वेगळे दिसतात, त्यात नसतो तो सचिन, नसतो तो द्रविड, नसतो तो युवराज, गांगुली, सेहवाग, लक्ष्मण, जवागल श्रीनाथ, मोहम्मद कैफ, अनिल कुंबळे, जहिर खान! दिसतो तो फक्त जुना खेळाडू आपला धोनी!

मध्येच भारत आणि ऑस्ट्रेलिया सामना झाला, भारताने या सामन्यावर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. हे पहात असताना तो काळ आठवला जेव्हा या आधीच्या विश्‍वचषक तसेच प्रमुख मोठ्या मालिकांमध्ये जेंव्हा जेंव्हा भारत अडचणीत सापडला तेंव्हा तेंव्हा युवराज सिंगने केलेली उत्तम कामगिरी आणि मिळवून दिलेला विजय. इंग्लंडमधील नॅटवेस्ट मालिकेच्या अंतिम सामन्यात मोहम्मद कैफ सोबत केलेली दमदार कामगिरी आणि देशाला मिळवून दिलेला चषक…आणि आठवला तो क्षण जेंव्हा मी 2014 साली शिक्षण क्षेत्रात एक पाऊल टाकलं .. माझ्या खोलीच्या खाली एक लहान मुलगा एकटाच आपल्या घराच्या अंगणात हातात बॅट धरून अगदी हुबेहुब युवराज सिंगची नक्कल करताना… एक चांगली व्यक्ती बऱ्याच आठवणी देवून जाते. एकच किंग, सिक्‍सर किंग म्हणजेच आपला युवराज सिंग!!!

– अक्षय दिनकर भोगाडे

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here