पुणे जि.प.ची पदभरती नक्‍की अडकली कुठे?

पुणे – जिल्हा परिषदे अंतर्गत सरळसेवेच्या रिक्तपदांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले. त्यानुसार मोठ्या संख्येने उमेदवारांनी अर्ज भरले. त्याला दीड महिना उलटला आहे, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिताही संपली असून आता पदभरतीचे “घोडे नक्की अडले कुठे? असा प्रश्‍न उमेदवारांकडून उपस्थित केला जात आहे.

जिल्हा परिषदेअंतर्गत सरळसेवेची रिक्त पदे भरण्यासाठी लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वीच जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. त्यामध्ये गट- क संवर्गातील अनुसूचित क्षेत्राबाहेरील (बिगर पेसा) 584 पदे आणि अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) 11 पदे असे एकूण 595 पदांची भरती करण्यात येणार आहे. त्यामध्ये आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, विस्तार अधिकारी, कनिष्ठ अभियंता, कंत्राटी ग्रामसेवक, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, पशुधन पर्यवेक्षक, पर्यवेक्षिका, वरिष्ठ सहाय्यक (लिपीक) आणि (लेखा) कनिष्ठ लेखाधिकारी ही अनुसूचित क्षेत्राबाहेरील रिक्त पदे भरण्यात येणार आहे. तर अनुसूचित क्षेत्रातील आरोग्य सेवक आणि सेविका पदे भरण्यात येणार आहे. दरम्यान, उमेदवारांना ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी 26 मार्च ते 16 एप्रिल ही मुदत देण्यात आली होती. मात्र, आचारसंहिता आणि काही तांत्रिक अडचणींमुळे अर्ज भरण्यास पुन्हा सात दिवसांची मुदतवाढ देण्यात आली. त्यानुसार हजारो उमेदवारांनी अर्ज भरले. अनेक दिवसांनंतर भरती प्रक्रिया सुरू झाल्याने तरुणांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र, अर्ज भरून दीड महिना झाला आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिताही संपली तरीही अद्याप राज्य सरकारकडून पदभरतीबाबत कोणत्याच हालचाली सुरू झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे यंदा पदभरती होणार का? केवळ पदभरतीचे आश्‍वासन मिळणार अशी धाकधूक उमेदवारांमध्ये निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)