पुणे – नियोजनाचा अभाव, तोटा, बसेसची दुरवस्था आदी समस्यांमुळे टीका होत असणाऱ्या पीएमपीएमएलने मात्र स्वच्छतेच्या बाबतीत अनोखी शक्कल लढविली आहे. पीएमपीएमएलच्या ताफ्यात दाखल होणाऱ्या बसेसमध्ये “डस्टबिन’ची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रशासनाने राबविलेल्या या अनोख्या “स्वच्छतेच्या पुणे पॅटर्न’मुळे पीएमपीएमएलच्या परिस्थितीमध्ये बदल होत असल्याची चिन्हे दिसत आहेत.
शहरातील सर्वात मोठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असणाऱ्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या शहरामध्ये हजारो बसेस रोज धावताना दिसतात. अनेकदा या बसेसची दुरवस्था, धुराचे लोट, वारंवार ब्रेकडाऊन आणि महामंडळाला सहन करावा लागणारा आर्थिक तोटा या सगळ्याच कारणांमुळे पीएमपी चर्चेचा विषय ठरली आहे. मात्र, या अनोख्या उपक्रमाचे प्रवाशांकडून स्वागत करण्यात येत आहे.
पीएमपीकडे असणाऱ्या टाटा कंपनीच्या बसेसमध्ये सुरुवातीला डस्टबिन बसविण्यात आले. त्यानंतर सीएनजी, तेजस्विनी आणि ई-बसेस अशा प्रशासनाकडे असणाऱ्या सुमारे 1,900पैकी जवळपास सर्वच बसेसमध्ये डस्टबिन बसविण्यात आले आहे. प्रवाशांनी बसमध्ये किंवा बसमधून उतरल्यानंतर स्वत:कडील कचरा रस्त्यावर टाकू नये, यासाठी हा पुढाकार घेण्यात आल्याची माहिती पीएमपीएमएलचे सहव्यवस्थापकीय संचालक अजय चारठणकर यांनी दिली. अनेकदा प्रवासी त्यांच्याकडील कचरा बसमध्ये टाकतात. प्रवाशांना बसमधून उतरल्यानंतर कचरापेटी शोधावी लागते. कचरा पेटी न सापडल्यास कचरा रस्त्यावर टाकला जात नाही. यामुळे स्वच्छता राहत नाही. यासाठी प्रवाशांना सोय उपलब्ध करुन देण्यासाठी या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. या उपक्रमाची सुरुवात पुणे शहरातून झाली. सध्या हा “पॅटर्न’ विविध कंपन्यांकडून देशभरामध्ये राबविण्यात येत असल्याचे चारठणकर यांनी नमूद केले.