तुकोबांच्या पालखीचे विड्यांच्या पानांनी स्वागत

निमगाव केतकीत मुक्‍काम; आज इंदापुरात मानाचे गोल रिंगण

रेडा – श्रीक्षेत्र देहू येथून निघालेला संत तुकाराम महाराज पालखी सोहळा, बेलवाडी येथील पहिले मानाचे गोल रिंगण उरकून निमगाव केतकी (ता. इंदापूर) येथे एक दिवस मुक्कामासाठी विसावला. राज्यात विड्याच्या पानासाठी प्रसिद्ध असणाऱ्या निमगावात वारकऱ्यांना विड्याची पाने देऊन, पालखी पंचासह पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याबाबत सविस्तर माहिती अशी की, संसर येथून पहाटे पालखी सोहळा बेलवाडीकडे रिंगणासाठी दाखल झाला. चिखली फाटा, लासुर्णे, जंक्‍शन तसेच अंथुर्णे येथे गावकऱ्यांचे मानसन्मान घेत निमगाव केतकीकडे मार्गस्थ झाला. अंथुर्णे ग्रामपंचायतीच्यावतीने पालखी सोहळ्याचे स्वागत तोफांच्या सलामीने करण्यात आले. आमदार दत्तात्रय भरणे तसेच गावचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले. त्यानंतर शेळगाव फाटा मार्गे गोतंडी वरून सोहळा निमगाव केतकीमध्ये दाखल झाला.

निमगाव केतकीत प्रथेप्रमाणे सौंदडीजवळ गावातील संत सावता माळी भजनी मंडळ, संत गुलाब बाबा भजनी मंडळ व केतकेश्‍वर भजनी मंडळ मंडळाने भजन गात पालखी सोहळ्याचे शिवेवर स्वागत केले. गावातील शेकडो महिलांनी सौंदडीच्या आसपास दगडाच्या लगोरी रचून संत जनाबाईंच्या ओव्या गात पालखीचे स्वागत केले. येथे विड्यांची पाने देत अनोखे स्वागतही करण्यात आले. यावेळी सरपंच छाया मिसाळ, उपसरपंच तुषार जाधव, सुवर्णयुग गणेश मंदिर ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष मच्छिंद्र आप्पा चांदणे, राष्ट्रवादीचे नेते दशरथ डोंगरे, भाजपचे नानासाहेब शेंडे, माजी सभापती दत्तात्रय शेंडे, अंकुश जाधव, शालन भोंग, दत्तात्रय मिसाळ, बाबाजी भोंग, अतुल मिसाळ उपस्थित होते.

निमगाव केतकी गावातील शाळेच्या प्रांगणात एक दिवसासाठी पालखी सोहळा मुक्कामी थांबला. संध्याकाळची मानाची आरती गावकऱ्यांच्या हस्ते करण्यात आली. अष्टविनायक ग्रुप, सुवर्णयुग गणेश मंदिर ट्रस्ट व पतसंस्था, जय भवानी माता पतसंस्था, गणेश पतसंस्था, मुस्लिम चॅरीटेबल ट्रस्ट, सुवर्ण योगेश्‍वर पतसंस्था यासह गावातील सामाजिक मंडळांनी पालखीतील वारकऱ्यांचे सर्व सुखसुविधा देत अन्नदान केले. आमदार दत्तात्रय भरणे यांनी पाण्याची अडचणी लक्षात घेत पंचायत समितीस सूचना करून 20 टॅंकरद्वारे वारकऱ्यांसाठी मुबलक पाणी उपलब्ध करून दिले. सुवर्ण गणेश मंदिर ट्रस्टचे संस्थापक मच्छिंद्र चांदणे यांच्या मार्गदर्शनाखाली वारकऱ्यांना सुखसुविधा पुरवण्यात आल्या. रात्रभर भजन कीर्तन प्रवचन याने निमगाव केतकी परिसर दुमदुमून गेला होता. रात्री उशीरापर्यंत भाविक भक्तगणांनी रांगा लावून पालखीचे दर्शन घेतले. सोहळा शुक्रवारी (दि. 5) तुकोबारायांचा पालखी सोहळा गणेश मंदिरातील मानाची आरती करून इंदापुरकडे रवाना होणार आहे.

इंदापुरात रंगणार दुसरे गोल रिंगण…
संत तुकोबारायांच्या पालखी सोहळा इंदापूर येथे एक दिवसीय मुक्‍कामासाठी शुक्रवारी दाखल होणार असून सकाळच्या प्रहरात रयत शिक्षण संस्थेच्या प्रांगणात दुसरे गोल रिंगण होणार आहे. सोहळ्याला आमदार दत्तात्रय भरणे, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती प्रवीण माने, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर व इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अंकिता शहा यांच्यासह तालुक्‍यातील हजारो नागरिक उपस्थित राहणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)