अमेरिका-चीन व्यापार युद्ध चिघळले
वॉशिंग्टन – अमेरिका आणि चीन यांच्यात सुरू असलेल्या व्यापार युद्धात समेट करण्याचा प्रयत्न जारी असला तरी प्रत्यक्षात मात्र या दोन देशांमधील व्यापार युद्ध चांगलेच चिघळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. आज अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी चीनकडून आयात केल्या जाणाऱ्या जवळपास सर्वच वस्तुंवरील करात वाढ करण्याची सुचना आपल्या प्रशासनाला केली आहे. सध्या चिनी वस्तुंवर दहा टक्के इतका आयात कर आहे तो आता 25 टक्के इतका करण्यात येणार आहे. त्यामुळे चिनी मालाच्या विक्रीवर त्याचा विपरीत परिणाम होणार आहे.
चीन कडून अमेरिकेत आयात केल्या जाणाऱ्या सुमारे तिनशे अब्ज डॉलर्सच्या मालावरील कर या निर्णयामुळे वाढणार आहे. दरम्यान अमेरिकेबरोबर चर्चा करून सध्याच्या व्यापार तणावावर तोडगा निघेल अशी आशा चीनने व्यक्त केली आहे. दरम्यान तिकडे अध्यक्षांच्या सुचनेवर अंमल करण्यास अमेरिकेच्या प्रशासनाने सुरूवात केली असून त्या विषयीची नोटीस लवकरच जारी केली जाणार आहे.
सोमवारपासूनच हे नवीन वाढीव कर लागू केले जातील असे एका अधिकाऱ्याने सांगितले. अमेरिकेबरोबर या संबंधात बोलणी करण्यासाठी चीनचे वरीष्ठ अधिकारी अमेरिकेच्या दौऱ्यावर आले होते त्यांची दोन दिवसांची चर्चा कोणत्याही निर्णयाविनाच थांबली. त्यानंतर लगेच ट्रम्प यांनी हा आदेश लागू केला.