चिनी वस्तूंवरील आयात शुल्क अमेरिकेने वाढविले

वॉशिंग्टन – गेल्या एक वर्षाच्या ऊनसावल्यांच्या खेळानंतर अखेर शुक्रवारी अमेरिकेने चीनमधून अमेरिकेत येणाऱ्या 200 अब्ज डॉलरच्या वस्तूंवरील आयात शुल्क 10 टक्‍क्‍यांवरून 25 टक्‍के इतके केले आहे.  आता चीनने याला प्रत्युत्तर देण्याची धमकी दिली आहे. मात्र त्याचबरोबर अमेरिकेबरोबर चर्चा चालू ठेवण्याची इच्छा जाहीर केली आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, बऱ्याच दिवसांनंतरच्या चर्चेनंतर व्यापारयुद्धावर तोडगा अंतिम टप्प्यात आला होता. मात्र अचानक चीनने पुन्हा चर्चेची भाषा केली आहे. हा वेळ काढण्याचा प्रकार आहे. त्यामुळे आम्ही चीनबरोबर चर्चा करण्यास तयार आहोत. मात्र, दरम्यानच्या काळात आम्ही चीनच्या आयातीवरील शुल्क वाढविले आहेत. जर चर्चेनंतर योग्य तोडगा निघाला तर त्या तोडग्याच्या आधारावर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. दरम्यानच्या काळात चीनचे उपपंतप्रधान लि हू हे अमेरिकेच्या वाणिज्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करीत आहेत.

चीन अनेक दिवसांपासून अमेरिकेबरोबर असंतुलित व्यापार करीत आहे. त्यामुळे अमेरिकेच्या निर्यातीपेक्षा आयात तब्बल 375 अब्ज डॉलरनी जास्त आहे. माझ्या अगोदरच्या अध्यक्षांनीच मी जो निर्णय घेतला अशा प्रकारचा निर्णय घेण्याची गरज होती. अमेरिकेबरोबर असंतुलित व्यापार करून चीन स्वतःची आर्थिक प्रगती करीत आहे, असे ट्रम्प म्हणाले.

चीनने स्वतःची आर्थिक प्रगती जरूर करावी. मात्र त्यासाठी अमेरिकन अर्थव्यवस्थेचा बळी जाऊ नये. यासाठी आपण हा निर्णय घेतला आहे. मात्र चीनबरोबर तोडगा काढण्यासाठी आम्ही चर्चा करण्यास तयार आहोत, असे त्यांनी म्हटले आहे. चीनने मात्र सायंकाळपर्यंत तरी आयात शुल्कावर कसलेही भाष्य केले नव्हते.

“चीनने चर्चेच्या नावाखाली वेळकाढूपणाची भूमिका घेतली आहे. त्यामुळे आम्ही चीनमधून अमेरिकेत होणाऱ्या आयातीवरील शुल्क वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यानच्या काळात चीनबरोबर बोलणी चालू राहील. भविष्यात त्या आधारावर योग्य तो निर्णय घेण्याची अमेरिकेची तयारी आहे.
-डोनाल्ड ट्रम्प, अध्यक्ष, अमेरिका

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)