नवी दिल्ली -स्टेट बॅंक ऑफ इंडियाने आपल्या मुख्य व्याजदरात म्हणजे एमसीएलआरमध्ये 0.05 टक्क्यांनी कपात केली आहे. ही कपात सर्व कालावधीच्या कर्जाला लागू होणार असल्यामुळे ग्राहकांचे कर्जावरील हप्ते कमी होणार आहेत. स्टेट बॅंकेने आज जारी केलेल्या माहितीनुसार एक वर्षासाठीचा एमसीएलआर 8.50 टक्क्यांवरून 8.45 टक्के इतका करण्यात आला आहे. ही कपात 10 मे पासून लागू होणार आहे.
गेल्या महिन्यातच स्टेट बॅंकेने एमसीएलआरमध्ये 0.05 टक्क्यांनी कपात केली होती. स्टेट बॅंकेने आपल्या कर्जावरील व्याजदराचा संबंध आता थेट रिझर्व्ह बॅंकेच्या रेपो दराशी लावलेला आहे. स्टेट बॅंकेने व्याजदरात कपात केल्यामुळे इतर बॅंकांही व्याजदरात कपात करण्याची शक्यता आहे.
या अगोदर रिझर्व्ह बॅंकेने रेपो या आपल्या मुख्य व्याजदरात कपात करूनही इतर बॅंका मात्र कर्जावरील व्याजदरात कपात करण्यासाठी चालढकल करीत होत्या. मात्र आता आगामी काळात लवकर व्याजदर कपात होईल.