महसूलमंत्री चंद्रकांत दादांचा वाढदिवस: दुष्काळग्रस्त विद्यर्थ्यांना मदतीसाठी निधी उभारला जाणार
कोल्हापूर- राज्याचे महसूल मंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने कोल्हापुरात साजरा होतोय. दुष्काळग्रस्त भागातील मुलींच्या शिक्षणासाठी चंद्रकांतदादा मदत करणार आहेत. त्यासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना हार किंवा पुष्पगुच्छ न आणता चेकच्या रूपाने पैसे देण्याचे आवाहन चंद्रकांत दादा पाटील यांनी केलं आहे.
राज्याचे महसूल मंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचा वाढदिवस आज कोल्हापुरातील त्यांच्या निवासस्थानी दिवसभर साजरा होत आहे. यानिमित्ताने चंद्रकांत दादा पाटलांनी पुष्पगुच्छ न आणता दुष्काळग्रस्त भागासाठी मदतीचं आवाहन केलं होतं. विशेषतः महाराष्ट्रातील मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग हा दुष्काळाच्या गर्तेत आहे. त्यामुळे पुष्पगुच्छ द्वारे शुभेच्छा न देता आर्थिक मदत करण्याचं आवाहन चंद्रकांत दादा पाटील यांनी केलं होतं.
त्यानुसार त्यांना शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या तमाम लोकांनी आज दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना मदतीसाठी निधी जमा केला जात आहे .दुष्काळाचा मुलींच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. तो परिणाम होऊ नये म्हणून त्यांना शालेयपयोगी वस्तू दिल्या जाणार आहेत.
येत्या पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यांना दिलासा देणारी घोषणा होणार असल्याची शक्यता आहे. कृषी कर्जमाफीत जे काही शेतकरी राहिले असतील त्यांच्या संदर्भात अभ्यास सुरू असून येत्या अधिवेशनात त्याची घोषणा होऊ शकते… असे देखील चंद्रकांत दादा पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.
एकूणच महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दुष्काळी विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या मदती सोबतच अनेकांनी नेत्रदान करण्याचा संकल्प देखील या निमित्ताने सोडलेला आहे. आज पश्चिम महाराष्ट्रातील नव्हे तर महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून लोक चंद्रकांत दादांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत.