लष्करातील सेवा वेगळे आयुष्य जगण्याची संधी

एअर चिफ मार्शल बी. एस. धानोआ : 136 व्या तुकडीचा दीक्षांत सोहळा

पुणे – राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतून बाहेर पडल्यानंतर भविष्यातील लष्कराचे उत्त्तराधिकारी बनण्यासाठीचा प्रवास तुमची वाट पाहत आहे. या प्रवासात तुम्हाला अनेक कठीण आव्हाने झेलावे लागतील, त्यातूनच तुम्हाला सर्वाधिक समाधानही मिळेल. या प्रवासात सर्वोत्तम कामगिरी करून केवळ तुम्हालाच नवे तर तुमच्या पूर्वीच्या लष्करी पिढीचा गौरवदेखील तुम्हाला वाढवायचा आहे. लष्करातील सेवा ही केवळ एक व्यावसायिक संधी नाही तर एक वेगळे आयुष्य जगण्याची संधी आहे आणि या संधीचे सोने करण्यासाठी तुम्ही चांगली कामगिरी केली पाहिजे, असा सल्ला हवाई दल प्रमुख एअर चिफ मार्शल बी. एस. धानोआ यांनी प्रशिक्षणार्थी जवानांना दिला.

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 136 व्या तुकडीच्या दीक्षांत संचलनाची मानवंदना हवाई दल प्रमुख एअर चिफ मार्शल बी. एस. धानोआ यांनी स्वीकारली. यावेळी लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल एस.के.सैनी, एनडीए’चे प्रमुख कमांडट एअर मार्शल आय. पी. विपीन, उपप्रमुख रिअर ऍडमिरल एस. के. ग्रेवाल आणि प्राचार्य ओमप्रकाश शुक्‍ला उपस्थित होते.

या तुकडीतून 291 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात लष्कराचे 218, नौदलाचे 34 आणि हवाई दलाच्या 39 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तसेच, अफगाणिस्तान, भूतान, श्रीलंका, व्हिएतनाम, ताजिकिस्तान, मालदीव अशा मित्रराष्ट्रांमधील 15 विद्यार्थ्यांनीही एनडीए’मधून खडतर लष्करी प्रशिक्षण घेतले. डिव्हिजनल कॅडेट कॅप्टन संदीप कोरंगा याने राष्ट्रपतींचे सुवर्ण पदक पटकावले. बटालियन कॅडेट ऍडज्युटंट दिव्यम द्विवेदी याने रौप्य पदक आणि बटालियन कॅडेट कॅप्टन शिवकुमारसिंह चौहान याने कांस्य पदक मिळविले.

चित्ता हेलिकॉप्टर्स आणि त्या नंतर आलेल्या भारतीय हवाई दलाच्या ताफ्यातील स्वनातीत वेगाने आकाशात भिरभिरणाऱ्या सुखोई एमकेआय 30′ या विमानांनी जोरदार सलामी दिली. अशा उत्साहपूर्ण वातावरणात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात एनडीएचे दीक्षांत संचलन दिमाखात पार पडले.

कडक उन्हाचा फटका
शहर आणि परिसरात सध्या उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. कमाल तापमानाचा पारा चाळिस अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदला जात आहे. गुरुवारी सकाळीही कडक ऊन जाणवत होते. अशा वातावरणात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत संचलनाला सुरुवात झाली. संचलन करत पुन्हा जागेवर परत जात असतानाच तीन विद्यार्थी पडले. ते परत उठून संचलनात सहभागी झाले. यातून संचलन करणाऱ्यांना कडक उन्हाचा फटका बसल्याचे दिसून आले.

मी मूळचा उत्तराखंड येथील आहे. माझे वडील वकील असून आई गृहिणी आहे. माझे शिक्षण सैनिकी स्कूलमध्ये झाले होते. तिथूनच सैन्य दलात जाण्याची प्रेरणा मिळाली. माझ्या या प्रवासामध्ये माझे आई-वडिल, शाळेचे शिक्षक आणि प्रबोधिनीचे प्राध्यापक या सर्वांची मोलाची साथ मिळाली आहे. प्रबोधिनीतील खडतर प्रशिक्षण पूर्ण करताना नेहमीच स्वत:मधील क्षमतांची जाणीव होत होती. विशेषत: कॅम्प तोरणा हा शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सर्वाधिक आव्हानात्मक भाग होता. मात्र, या आव्हानांमुळेच स्वत:तील क्षमतांचा विकास करता आला. यापुढे आयएमए येथील प्रशिक्षण पूर्ण करून इंफ्रन्ट्रीमध्ये जाण्याचा मानस आहे.
– संदीप कोरंगा, प्रेसीडेंट सुवर्णपदक विजेता


” प्रबोधिनीतील प्रशिक्षण हे तुम्हाला जीवनातील प्रत्येक आव्हानासाठी सज्ज करते. याठिकाणी येऊन तुम्ही खऱ्या अर्थाने परिपूर्ण बनता. त्यामुळेच प्रबोधिनीतील प्रशिक्षण हे आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा काळ होता. विशेष म्हणजे माझा भाऊदेखील प्रबोधिनीचा माजी विद्यार्थी आहे. तो 132 व्या तुकडीचा छात्र होता आणि सध्या नौदलात कार्यरत आहेत. त्याच्यामुळेच मला प्रबोधिनीत येण्याची प्रेरणा मिळाली. मी देखील पुढील प्रशिक्षण पूर्ण करून नौदलात दाखल होणार आहे.
– दिव्यम द्विवेदी, रौप्य पदक विजेता


माझ्यावर लहानपणापासूनच वडिलांची लष्करातील शिस्तबद्ध जीवनशैलीचा मोठा प्रभाव होता. तेव्हापासूनच माझी लष्करात रुजू व्हायची प्रखर इच्छा होती. त्यामुळे माझ्या वडिलांना इयत्ता सहावीनंतरच मला बंगळूर सैनिकी शाळेत दाखल केले. बारावीनंतरच प्रवेश परीक्षा देऊन मी “एनडीए’मध्ये आलो. सैनिकी शाळेत शिक्षण घेतल्यामुळे सैन्याच्या जीवनाबाबत बरीचशी माहिती होती. मात्र, प्रबोधिनीतील प्रशिक्षण अपेक्षेपेक्षा थोडे जास्तच खडतर होते. मात्र त्यामुळेच खऱ्या अर्थाने घडलो.
– एस.के.एस चौहान, कांस्य पदक विजेता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)