इंद्रायणी नदीवरील पूल वाहतुकीसाठी खुला

बाह्यवळणाचे काम अंतिम टप्प्यात : पालखी सोहळ्याच्या पार्श्‍वभूमीवर पालिकेकडून व्यवस्था

आळंदी -आषाढी वारीच्या निमित्ताने पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी आळंदीत दाखल होणाऱ्या लाखो भाविकांच्या सोयीसाठी आळंदी नगरपरिषदेने सोयी, सुविधा पुरविण्यासाठी पावले टाकली असून गर्दीचा अंदाज लक्षात घेत इंद्रायणी नदीवरील सिद्धबेट बंधाऱ्यानजीकचा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे.

येथील बाह्यवळण रस्ता व पूल जोड काम अंतिम टप्प्यात आहे. पालिकेने महाराष्ट्र शासनाच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून इंद्रायणी हॉस्पिटल ते इंद्रायणी नदी, सिद्धबेट बंधाऱ्यापर्यंतचा अंदाजे एक किलोमीटरचा बाह्यवळण रस्ता पूर्ण झाला असून या रस्त्याला जोड असणारा इंद्रायणी नदीवरील पूलदेखील पूर्ण झाला असून वाहतुकीस खुला करण्यात येणार आहे. पुलापासून पुढील रस्ता मात्र, भूसंपादनाअभावी रखडलेला होता तो काही लवकरच मार्गी लागेल असे पालिका सांगत आहे. तत्पूर्वी पालिकेने पुलावरून दक्षिणेला पुढे आल्यावर उजव्या बाजूने साधा रस्ता वाहतुकीस खुला केला आहे. पुढे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विनंती करून त्यांच्या हद्दीतील रस्ता डांबरीकरणास सांगितले असून तेथे पिंपरी पालिकेने डांबरीकरण केले आहे. यामुळे वाहने थेट कुठेच गर्दीत न अडकता थेट आळंदी-देहू बीआरटीएस रस्ताला जाऊन मिळणार आहेत.

यामुळे शहरातील नवा पूल, चाकण चौकात होणारी वाहतूककोंडी कमी होणार आहे. बहुतेक दिंड्या या नदी पलीकडे दक्षिण बाजूला विसावलेल्या असतात त्या दर्शनासाठी बाहेर पडताना नवा पूल, चाकण चौकाचा वापर करतात यामुळे पुण्याकडे जाणारी वाहने व वारकरी यांची पुलावर गर्दी होते. गेल्या वर्षी तर गर्दी झाल्याने काही वारकरी जीव धोक्‍यात घालून बंधारावरून नदी ओलांडताना दिसून आले होते. यामुळे यंदा बाह्यवळण रस्ता सुरू झाल्याने नदी ओलांडणे सोपे जाणार आहे. याबरोबरच शहरातील सिद्धबेट परिसर, पश्‍चिमेकडील वाहने अंतर्गत रस्त्यावर स्थिरावण्यास मदत होणार आहे, यामुळे मुख्य चौकात वारकऱ्यांना विनाअडथळा फिरता येणार आहे.

एकेरी वाहतुकीचा विचार
वारी काळात चाकण चौक, नवा पुला वाहतुकीसाठी बंद असतो अशावेळी वाहनांना पर्यायी मार्ग म्हणून आळंदी फाटा व चिंबळी फाटा रस्त्याचा वापर करावा लागतो. यावेळी यावर विचार करत रस्ता पूर्ण नसला तरी वाहतूककोंडी कमी करण्यास पुलाचा वापर व्हावा या उद्देशाने पुलाच्या उजवीकडील रस्ता वापरास योग्य केला असून तद्‌नंतर पिंपरी पालिकेचा डांबरी रस्ता आहे. यामुळे पर्यायी रस्ता म्हणून याचा प्रामुख्याने वापर होऊ शकतो. या रस्त्यावरून पोलिसांशी चर्चा करत एकेरी वाहतूक सुरू करण्याचा विचार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी समीर भूमकर, नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, उपनगराध्यक्ष सचिन गिलबिले यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.