“टीईटी’ 22 सप्टेंबर रोजी?

संग्रहित छायाचित्र

 राज्य परीक्षा परिषदेने शासनाकडे पाठविला प्रस्ताव ः मान्यतेची प्रतीक्षा

आता तरी परवानगी मिळणार का ?

15 जुलै 2018 नंतर एकही “टीईटी’ घेण्यात आलेली नाही. एप्रिल, मेमध्ये लोकसभा निवडणुका असल्याने या कालावधीत परीक्षा घेता आल्या नाहीत हे स्पष्टच आहे. परीक्षा कधी होणार याबाबत उमेदवारांकडून राज्य परीक्षा परिषदेकडे वारंवार विचारणा करण्यात येऊ लागली आहे. त्याची दखल घेऊन परिषदेने शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीचा दुसरा टप्पाही घेण्यात येणार आहे. त्यामुळे बहुसंख्य उमेदवारांचे लक्ष परीक्षेकडे लागले आहे. आता तरी शासन परीक्षा घेण्यास परवानगी देणार का, असा प्रश्‍न सध्या उपस्थित करण्यात येऊ लागला आहे.

पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने येत्या 22 सप्टेंबरला शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घेण्याबाबत राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडे परवानगी मागितली आहे. यास मान्यता मिळाल्यानंतर लगेच परीक्षा घेण्याबाबतची प्रक्रिया सुरू होणार आहे. राज्यातील शाळांमध्ये फेब्रुवारी 2013 नुसार इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गांसाठी शिक्षकाची नोकरी करण्यासाठी उमेदवारांना “टीईटी’ उत्तीर्ण होण्याचे बंधन घालण्यात आले आहे. त्यानुसार सन 2013, 2014 मध्ये डिसेंबरमध्ये परीक्षा घेण्यात आली होती. सन 2015 मध्ये पेपरफुटीच्या प्रकरणामुळे परीक्षा रद्द करण्यात आली होती.
ती परीक्षा जून 2016 मध्ये घेण्यात आली होती. त्यानंतर सन 2017 व 2018 मध्ये जुलै महिन्यात परीक्षा घेण्यात आल्या आल्या. आत्तापर्यंत एकूण पाच परीक्षा झाल्या आहेत. या पाचही परीक्षांमध्ये एकूण 70 हजार विद्यार्थ्यांची उत्तीर्ण झाले आहेत.

वर्षातून एकदाच “टीईटी’ घेण्यात येते. या परीक्षेची अर्ज मागविण्यापासून निकाल लावण्यापर्यंतची सर्व प्रक्रिया राज्य परीक्षा परिषदेकडूनच राबविण्यात येत असते. मात्र, शासनाने परवानगी दिल्यानंतर परीक्षा घेण्याचे कामकाज परीक्षा परिषदेला सुरू करता येते. जानेवारी 2019 मध्ये परीक्षा घेण्यास परवानगी मिळावी याबाबत राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी 18 सप्टेंबर 2018 रोजी शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिवांना पत्र पाठविले होते. मात्र, अद्याप त्यावर शासनाकडून कोणतीही मान्यता मिळालेली नाही. शासनाकडून केवळ परीक्षा कधी घेता येईल याची दोन वेळा फोनवरुन परिषदेकडे विचारणा करण्यात आली होती.

परीक्षा घेण्याबाबतचा निर्णय मात्र जाहिर करण्यात आलेला नाही. त्यानंतर आता पुन्हा परिषदेने येत्या सप्टेंबरमध्ये परीक्षा घेण्याच्या परवानगीचा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठविला आहे. जून ते ऑगस्ट हा पावसाचा कालावधी असतो. या कालावधीत परीक्षा घेताना अनेक अडचणी निर्माण होण्याची शक्‍यता असते. उत्तरपत्रिकांच्या “ओएमआर शिट’ही स्कॅनिंग करण्यास तांत्रिक अडचणी येतात. त्यामुळे या कालावधीत परीक्षा घेणे शक्‍य होणार नाही, असे अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, 15 सप्टेंबरला एमपीएससी परीक्षा आहे. 29 सप्टेंबरला घटस्थापना आहे. त्यामुळे 22 सप्टेंबर ही तारीख “टीईटी’ परीक्षेसाठी सोयीची असल्याचा विचार परिषदेकडून करण्यात आला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)