सातारा – साताऱ्यात समोवारी सायंकाळी पाचच्या सुमारास कुरिअर बॉयचे अपहरण करून लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली. याप्रकरणी शैलेश सूर्यकांत भोकरे (रा.चिमणपुरा पेठ,सातारा) याने सातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात तिघांच्या विरोधात तक्रार दिली आहे. याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की, तक्रारदार भोकरे हे साताऱ्यातील एका कुरिअर कंपनीत कुरिअरबॉयची नोकरी करत आहे. तो नेहमीप्रमाणे कुरिअरची डिलिव्हरी करण्यासाठी निघाले होते.
दरम्यान शहरातील एलबीएस कॉलेज जवळ अज्ञात तिघांनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांच्याकडीळ एक घड्याळ व कुरिअरची काही पार्सल हिसकावली. त्यानंतर एका संशयितांने तक्रारदाराला त्याच्याच दुचाकीवर जबरदस्तीने बसवून ढोर गल्लीमार्गे शहरातील नवीन यशवंत हॉस्पिटल येथे नेले. हॉस्पिटलच्या जवळ असलेल्या चिंचेच्या झाडाखाली दुचाकी थांबवली. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी भोकरे यांना मारहाण करून त्यांच्या खिशातील सात हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले व पळून गेले. पुढील तपास सातारा शहर पोलीस करत आहे.