“भावी कलाकारांचे’ लक्ष
माध्यमांमध्ये विशेषत: चित्रपट क्षेत्रामध्ये येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी “फिल्म इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ ही संस्था जणू सुवर्णसंधीच असते. गेल्या काही काळामध्ये टीव्ही विभागाच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पुरस्कार, आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाले आहेत. प्रत्येक “भावी कलाकार’ “एफटीआयआय’मध्ये शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहात असतो.एफटीआयआयमध्ये प्रवेश मिळण्यासाठी विद्यार्थ्यांची चढाओढ सुरू असते. यालाच जोड म्हणून यंदा पाच अभ्यासक्रमांना नव्याने परवानगी मिळाल्याने विद्यार्थ्यांचे “एफटीआयआय’कडे अधिकच लक्ष वेधले गेले आहे.
पुणे – अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (एफटीआयआय) पाच अभ्यासक्रमांना मान्यता दिली आहे. “आर्टस् ऍन्ड क्राफ्ट’ या विभागातून अभ्यासक्रमांना मान्यता मिळवणारी “एफटीआयआय’ ही देशातील पहिलीच संस्था ठरली आहे. “एफटीआयआय’ची मान्यता मिळालेले पाचही अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष 2019-20 मध्ये सुरू होणार असल्याचे एफटीआयआयच्या वतीने सांगण्यात आले.
“एफटीआयआय’च्या पाच पदविका अभ्यासक्रमांपैकी चार अभ्यासक्रम दूरचित्रवाणीशी (टीव्ही) संबंधित आहेत. तर एक अभ्यासक्रम चित्रपटाशी संबंधित आहे. “एआयसीटीई’ने दिग्दर्शन, इलेक्ट्रॉनिक सिनेमॅटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग ऍन्ड साउंड रेकॉर्डिंग, टीव्ही इंजिनिअरिंग आणि स्क्रीन-प्ले रायटिंग (पटकथा लेखन) या अभ्यासक्रमांना मान्यता दिली आहे. हे सर्व एक वर्ष मुदतीचे पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम आहेत.
“एफटीआयआय’च्या फिल्म विंगच्या सहा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमांना दोन वर्षांपूर्वी असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजच्या वतीने पदव्युत्तर पदवीच्या सममूल्य मान्यता देण्यात आली होती. आता टीव्ही विभागाच्या अभ्यासक्रमांना “एआयसीटीई’नची मान्यता मिळाल्यामुळे संस्थेतील अभ्यासक्रमांना राष्ट्रीय पातळीवरील मान्यता मिळाली आहे.