बॉलिवूड अभिनेत्री झायरा वसिमने अभिनय सोडत असल्याचा निर्णय सोशल मीडियावरून जाहीर केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. झायराने तिच्या सोशल मीडियाच्या तिन्ही अकाऊंट्सवर पोस्ट शेअर करत तशी घोषणा केली. आपल्या पोस्टमध्ये झायराने सांगितले की, “इस्लामपासून आपण दूर होतोय, त्यामुळे मला त्याचा त्रास होतोय. यावर खूप विचार करून मी हा निर्णय घेतलाय’. यावेळी झायराचे सोशल मीडिया अकाऊंट कोणी तरी हॅक केले आणि त्यामुळेच ही पोस्ट करण्यात आल्याचे अनेकांनी म्हटले होते. मात्र यावर झायराच्या मॅनेजरने खुलासा केला आहे.
“झायरा वसिमचे ट्विटर अकाऊंट हॅक झाले आहे, असे कोण म्हणते आहे. आम्ही तर असे काहीही सांगितलेले नाही. तिचे अकाऊंट हॅक झालेले नाही. ती पोस्ट सुद्धा तिनेच केली आहे’, अशी माहिती झायराचे व्यवस्थापक तुहिन मिश्रा यांनी दिली आणि झायराच्या बॉलिवूड सोडण्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
झायरा सध्या “स्काय इज पिंक’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तिने सोशल मीडियावर केलेल्या पोस्ट्सला ग्राह्य धरले तर हा चित्रपट झायराचा अखेरचा चित्रपट ठरू शकतो. या चित्रपटात प्रियंका चोप्रा आणि फरहान अख्तर पण आहेत. या चित्रपटाद्वारे प्रियंका बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार आहे.