जागा खाली करण्याचा अधिकार

नारायणगाव – नारायणगाव (ता. जुन्नर) ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जागेत असलेल्या सावित्रीबाई फुले विकास संस्थेच्या कार्यालयाचा बेकायदेशीर ताबा घेऊन अपहार केल्याप्रकरणात नारायणगाव पोलिसांनी जिल्हा परिषदेकडून आधिकाराबाबत कायदेशीर माहिती मिळण्याबाबत जिल्हा परिषदेने दिलेल्या माहितीनुसार ग्रामपंचायतीला स्वतःसाठी अथवा इतर महत्त्वाच्या कामासाठी जागा खाली करण्याचा अधिकार असल्याची माहिती दिल्याने या गुन्ह्यात नारायणगाव (ता. जुन्नर) पोलीस काय निर्णय घेणार, याकडे सर्व ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

नारायणगावचे सरपंच योगेश पाटे यांच्या सांगण्यावरून 14 मे 2019 ला दुपारी दोनच्या सुमारास ग्रामपंचायत सदस्य राजेश बाप्ते, गणेश पाटे, ग्रामपंचायत कर्मचारी गोपी खंडे, बाळासाहेब औटी हे ग्रामपंचायतीचा ट्रॅक्‍टर ट्रॉली घेऊन आले आणि सावित्रीबाई फुले विकास संस्थेच्या कार्यालयातील साहित्य व कपाटातील 52 हजार रोख असे सर्व साहित्य ट्रॉलीमध्ये भरून इतरत्र घेऊन गेले, तसेच त्यांनी संस्थेच्या कार्यालयात बेकायदेशीरपणे कुलूप लावून कार्यालयात जाण्यास कर्मचाऱ्यांना मज्जाव केला, या सावित्रीबाई फुले विकास संस्थेच्या संस्थापिका व माजी जिल्हा परिषद सदस्या राजश्री बोरकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सरपंच योगेश पाटे, राजेश बाप्ते, गोपी खंडे, बाळासाहेब औटी, गणेश पाटे या पाच जणांवर गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात पोलिसांनी 3 जूनला ग्रामपंचायत मिळकतीचा ताबा घेऊ शकते का, ग्रामपंचायतीला तो अधिकार कोणत्या कायदयान्वये आहे, यासंदर्भात जिल्हा परिषदेकडून कायदेशीर बाबीसाठी पत्रव्यवहार केला होता.

त्यानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या पत्रातील माहितीनुसार महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 मधील तरतुदीनुसार ग्रामपंचायतीला स्थावर-जंगम मिळकत विक्री, गहाण अगर अन्य रीतीने हस्तांतरीत करण्याचा, तसेच पट्ट्याने देण्याचे अधिकार आहे; परंतु ग्रामपंचायतीला तीन वर्षांपेक्षा जास्त मुदतीसाठी भाडेकरारास, विक्री, गहाण, बक्षीस इत्यादी व्यवहारांसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांची परवानगी घ्यावी लागते आणि एक वर्षापेक्षा जास्त मुदतीचा भाडेपट्टी सबरजिस्ट्रारकडे नोंदवावा लागतो.

भाड्याने दिलेला हॉल भाडेकरारानुसार मुदत संपली असल्यास किंवा ग्रामपंचायतीला अशी मिळकत स्वतःसाठी अथवा इतर महत्त्वाच्या कामासाठी आवश्‍यक असल्यास संबंधितांना आगावू सुचना देऊन, अशी मिळकत ग ग्रामपंचायत रिकामी करून घेऊ शकते, अशी माहिती दिली आहे. त्यामुळे आता या संस्थेबाबत पोलीस कोणती भूमिका घेतात, याकडे नारायणगावकरांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)