पुणे विद्यापीठात संचालकांचे राजीनामा सत्र

एसएनएस, विद्यार्थी विकास मंडळाच्या संचालकपदाचा डॉ. प्रभाकर देसाई यांनी दिला राजीनामा

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अशोक चव्हाण यांच्या पाठोपाठ राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळ या दोन्ही विभागाच्या प्रभारी संचालकपदांचा डॉ. प्रभाकर देसाई यांनी राजीनामा दिला आहे. विद्यापीठात “राजीनामा’ सत्रच सुरू आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गेल्या काही दिवसांपासून विद्यापीठ विविध प्रकरणातून सतत चर्चेत येऊ लागले आहे. एखादे प्रकरण घडले की त्यावर चौकशी समिती नेमली जाते. त्याचा अहवाल सादर झाला की त्यानुसार कार्यवाही होत असते. विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून ऑनलाइन प्रश्‍नपत्रिका पाठविण्याच्या प्रक्रियेत खूप गोंधळ झाला. या विरोधात विद्यार्थी संघटनांनी आवाज उठविला होता. आंदोलन करून कारवाई करण्याची मागणी केली होती. याच दरम्यान परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अशोक चव्हाण यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यापाठोपाठ डॉ. प्रभाकर देसाई यांनीही दोन आठवड्यांपूर्वीच विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.नितीन करमळकर यांच्याकडे राजीनामा दिला आहे.

विद्यापीठाच्या मराठी विभागात डॉ. प्रभाकर देसाई हे पूर्णवेळ सहयोगी प्राध्यापक पदावर कार्यरत आहेत. त्यांच्याकडे ऑक्‍टोवर 2016 रोजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळ या दोन्ही विभागाच्या संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता. काही महिन्यांसाठीच अतिरिक्त कार्यभार सांभाळावा लागणार आहे, असे विद्यापीठ प्रशासनाकडून सुरुवातीला सांगण्यात आले होते. मात्र, डॉ. देसाई यांनी दोन्ही विभागाच्या कामकाजासाठी खूप वेळ दिला. दोन्ही विभागात विविध उपक्रम राबवून विकासात्मक बदल घडवून उत्तम कामगिरी करुन दाखविली. नियमबाह्य व चुकीच्या कामकाजाला आळा बसविला. त्यामुळे त्यांच्याकडे दोन्ही विभागाच्या कामकाजाचा भार कायम ठेवला होता. दरम्यान आता महाविद्यालयातील विद्यार्थी निवडणुकांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी विकास मंडळाच्या कामासाठी पूर्ण वेळ काम करावे लागणार आहे. या दोन्ही विभागाच्या कामाचा खूप ताण येत असल्याने डॉ. देसाई यांनी संचालकपदांचा राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

विद्यार्थी विकास मंडळाच्या विभागामार्फत “कर्मवीर भाऊराव पाटील कमवा व शिका’ योजना राबविली जाते. या योजनेत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणाची चौकशी समितीमार्फत चौकशी करण्यात आली आहे. डॉ. प्रभाकर देसाई यांनी समितीच्या अहवालानुसार महत्त्वाची भूमिका बजावित प्रकरणातील दोषी विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांकडे आवश्‍यक ती सर्व महत्त्वाची कागदपत्रे नुकतीच सादर केली आहेत.

संचालकपदांच्या नव्या नियुक्तीबाबत उत्सुकता
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळ, राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी विकास मंडळ या तीनही विभागाच्या संचालकांनी राजीनामा दिल्यामुळे ही पदे रिक्त झाली आहेत. या पदावर कुलगुरूंकडून कोणाची नियुक्ती करण्यात येणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)