पुणे – शहरातील पदपथावर तसेच मुख्य रस्त्यावर वाहतुकीस अडथळा ठरणारे सुमारे 200 फिडर पिलर महावितरणकडून काढण्यात येणार आहेत. या फिडर पिलरला पर्याय म्हणून रिंग मेन युनिट हे अत्याधुनिक फिडर पिलर बसविले जाणार असून लवकरच त्याची प्रक्रिया महावितरणकडून पूर्ण केली जाणार आहे. महावितरण आणि महापालिकेच्या वेगवेगळ्या समस्यांबाबत झालेल्या समन्वय समितीच्या बैठकीत याबाबत चर्चा करण्यात आली.
शहरात अनेक ठिकाणी महावितरणच्या केबल फिडर पिलरसाठी जमीनीवर आहेत. त्यातच, सध्याचे असलेले फिडर पिलरचे बॉक्सही धोकादायक अवस्थेत आहेत. अशा स्थितीत पदपथाचा वापर करणाऱ्या नागरिकांना रस्त्याने चालताना मोठ्या अडथळ्यांचा सामना करावा लागतो. तसेच, जिविताला धोकाही निर्माण होतो. असे फिडर पिलर तातडीने हटविण्यात यावेत, अशी मागणी महापालिकेने या बैठकीत केली होती. यावेळी महावितरणकडून शहरातील धोकादायक फिडर पिलरचे सर्वेक्षण करण्यात आले असून लवकरच सुमारे 200 फिडर पिलर बसविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यात, प्रामुख्याने अस्तित्वातील फिडर पिलरपेक्षा अधिक सुरक्षित तसेच चार ते पाच फिडर पिलरसाठी एकच असणारे “रिंग मेन युनिट’ (आरएमयु) बसविण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. मात्र, त्यासाठी शहरातील खोदाईची आवश्यकता असून त्याबाबत पालिकेकडे प्रस्ताव पाठविण्यात आले असून 15 मेपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे सांगण्यात आले. तसेच, खोदाई शुल्क भरण्याच्या भरवशावर ही खोदाई परवानगी मिळावी अशी विनंतीही महापालिकेकडे करण्यात आली आहे.
असे आहेत “आरएमयु’ युनिट
फिडर पिलरला अत्याधुनिक पर्याय म्हणून “आरएमयु’ युनिट ओळखले जातात. विशेषत: चार ते पाच फिडर पिलरसाठी एकच “आरएमयु’ बसविणे शक्य असते. तसेच, काही तांत्रिक बिघाड झाल्याने वीजपुरवठा खंडीत झाल्यास एका फिडर पिलरमधून दुसऱ्या फिडर पिलरमध्ये वीजपुरवठा करण्याची स्वयंचलित यंत्रणा यात असते. तसेच, हे सुरक्षितही असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.