आरटीओचा महसूलही झाला कमी
गेल्यावर्षी 5 हजार 693 वाहनांची नोंदणी
यंदा आकडा 3 हजार 698 पर्यंत घसरला
पुणे – साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेला शहरामध्ये वाहन खरेदीसाठी सर्वत्र गर्दी दिसत असली. तरी प्रत्यक्षात मात्र गेल्या वर्षीपेक्षा यंदाची वाहन खरेदी आणि आरटीओचा महसूल घटल्याचे दिसून येत आहे. पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे गेल्यावर्षी 5 हजार 693 वाहनांची नोंदणी झाली होती. यावर्षी तो आकडा 3 हजार 698 पर्यंत घसरला आहे.
साडेतीन मुहूर्तावर घरी वाहन आणण्यासाठी जवळपास 1 आठवडा आधीपासून वाहन खरेदीसाठी प्रक्रिया सुरू झाली होती. दि. 4 ते 7 मेपर्यंत खरेदी वेग घेतला होता. मात्र, बाजारात गर्दी दिसत असली, तरी नोंदणीचा आकडा आणि महसूल घसरल्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले. मागील वर्षी सुमारे साडेपाच हजार वाहन नोंदणीतून कार्यालयाला 20 कोटी 11 लाख 99 हजार 123 रुपयांचा महसूल प्राप्त झाला होता. मात्र, यंदा हे उत्पन्न 10 कोटी 69 लाख 29 हजार 294 रुपयांपर्यंत घसरले आहे.
शहरातील वाहनांची संख्या 40 लाखांपेक्षा जास्त आहे. “एक व्यक्ती, एक वाहन’ या सूत्राचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना देखील सणांच्या निमित्ताने वाहन खरेदी करण्याच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे शहराच्या वाहतूक कोंडीमध्ये अजूनच भर पडणार आहे. वाढत्या वाहन संख्येमुळे पुणेकरांना वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.
केवळ सणांना दहा हजार वाहने रस्त्यावर
बहुतांश वेळा सणांच्या निमित्ताने वाहन खरेदी केली जाते. साडेतीन मुहूर्तांपैकी शहरामध्ये गुढीपाडवा आणि अक्षय तृतीयेच्या निमित्ताने वाहनखरेदीने वेग घेतला असून तब्बल 10 हजार 896 वाहने रस्त्यावर उतरली आहेत. 2019 मध्ये गुढीपाडव्याला तब्बल सात हजार 118 तर अक्षय तृतीयेला 3 हजार 698 वाहनांची नोंदणी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये झाली.