पुणे – सोसायट्यांखाली जिवंत बॉम्ब…!

इमारतींच्या तळघरातच स्वीट मार्टचे भटारखाने : सुरक्षेची ऐशीतैशी

– संजय कडू

पुणे – आगीच्या वाढत्या घटना लक्षात घेता, त्या घटना घडल्यानंतर तेथील त्रुटींवर चर्चा केली जाते. अस्वच्छता आणि असुरक्षितता या बाबी लक्षात घेतल्या, तरी त्यावर कारवाई होत नाही. तर, दुसऱ्या बाजूला शहरातील अनेक सोसायट्यांच्या तळघरात अथवा तेथील एखाद्या गाळ्यात पदार्थ तयार केले जातात. यातील अनेकांकडे परवाने नसतात. तर, आगीसारखी दुर्घटना घडल्यानंतर तेथून बाहेर पडण्याचा मार्गही नसतो. या व्यावसायिकांची एखादी किरकोळ चूकही संपूर्ण सोसायटीच्या जीवावर उठू शकते. ही बाब लक्षात घेऊन दैनिक प्रभातने “ग्राऊंड झिरो’ रिपोर्ट तयार केला असता, अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या.

सुरक्षाही वाऱ्यावर
स्वीट मार्ट असो व बेकरी त्यांचे भटारखाने असुरक्षितच असल्याचे आढळते. आग विझविण्यासाठीची कोणतीही सक्षम यंत्रणा नसते. तशी यंत्रणा असली, तर ती कालबाह्य झालेली असणे, बहुतांश ठिकाणी भटारखान्यातून बाहेर पडण्यासाठी वेगळा रस्ता नसणे अशा असुरक्षित व अस्वच्छ वातावरणात भटारखान्यातील कामगारांना काम करावे लागत आहे. काचेच्या काऊंटरमध्ये आकर्षकरित्या मांडलेली मिठाई पाहताचक्षणी कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल, अशी असते. त्याला लावलेला चांदीचा वर्ख तर अप्रतिमच. मात्र, मिठाई बनवण्यासाठी वापरलेले पदार्थ व ती बनवताना भटारखान्यातील अस्वच्छता कोणालाही दिसत नाही. दिवाळीत सापडलेला बनावट खवा, गुजरातहून आलेली कमी दर्जाची स्पेशल मिठाई, वर्षातून एखाद्या दुसऱ्या ठिकाणी पडलेली “एफडीए’ची धाड अशा हाताच्या बोटावर मोजण्याइतक्‍या कारवाया वगळता खाद्यपदार्थ क्षेत्रातील अस्वच्छता व असुरक्षिततेसंदर्भात मात्र कधीच चर्चा होताना दिसत नाही.

…दहा लाख रु. दंड आणि 7 वर्षे कारावास
स्वीट मार्टमध्ये कमी दर्जाचा माल आढळल्यास परवाना निलंबित करण्याबरोबरच दोन लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. ही कारवाई करण्याचे अधिकार सह आयुक्‍तांना आहेत. तर, पदार्थांमध्ये भेसळ आढळल्यास न्यायालयाकडून 5 लाख रुपयांपर्यंत दंड तसेच 6 महिने ते सात वर्षापर्यंत कारावास घडू शकतो.

भेसळीचा खवा, कृत्रिम स्वीटनर आणि ऍल्यूमिनिअमचा वर्ख
सणासुदीला खव्यामध्ये होणारी भेसळ तर नित्याचीच झाली आहे. गुजरातमार्गे आलेला बनावट व कमी दर्जाचा खवा आणि स्पेशल मिठाईवर दरवर्षी अन्न व औषध प्रशासन धाड टाकते. विशेषत: हा उपनगर आणि वस्त्यांमधील स्वीट सेंटरमध्ये याची मोठ्या प्रमाणात विक्री होते. हा खवा डालडा, मैदा आणि रसायने एकत्र करुन तयार केला जातो. तर ग्रामीण भागामध्ये मिठाई व पेढ्यांमध्ये सर्रास पिठी साखरेची भेसळ असते. मिठाईला लावलेला चांदीचा वर्ख हाताने काढल्यास तो काळा झाला, तर हमखास समजावे तो ऍल्यूमिनिअमचा वर्ख आहे. चांदीचा वर्ख महाग असल्याने काही नामांकित स्वीट मार्ट वगळत इतरत्र सर्वत्र ऍल्यूमिनिअमचा वर्खच वापरला जातो. मिठाई आकर्षक दिसण्यासाठी तसेच तिच्या स्वादासाठी कृत्रिम रसायने व रंग वापरला जातो. हा रंग ठरवून दिलेल्या प्रमाणापेक्षा जास्त वापरला जातो. तो आरोग्यास अतिशय हानिकारक असतो. तर दुसरीकडे सारखरेपेक्षा कृत्रिम स्वीटनर स्वस्त असल्याने ते वापरण्याचे प्रमाणही वाढले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)