राजकीय धुरळा बसला पण धाकधूक वाढली

सातारा  – गेल्या दीड महिन्यापासून धडाडत असणाऱ्या आरोप प्रत्यारोपांच्या तोफांचा राजकीय धुरळा मंगळवारी मतदानानंतर खाली बसला. आता कॉलर की मिशी याचा राजकीय फैसला रिंगणातील नऊ उमेदवारांच्या निमित्ताने मशीन बंद झाला. “आमचं ठरलय’ अस उमेदवारांना ठासून सांगणाऱ्या मतदारराजाने साताऱ्याच्या भावी खासदाराचा काय कौल दिला याचे उत्तर आता येत्या 23 मे रोजी मिळणार आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाची धाकधूक मात्र निश्‍चित वाढली आहे.गेल्या दहा वर्षांपासून सातारा लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या उदयनराजे भोसले यांनी खासदारकीच्या हॅट्रिकसाठी जोरदार मोर्चेबांधणी केली होती.

थोरल्या पवारांनी आमदारांचा अंर्तगत विरोध पत्करूनही उदयनराजे भोसले यांच्याच नावाला पसंती दिली. राष्ट्रवादीची राजकीय ताकत एकसंघपणे उभी राहिल्याने उदयनराजे यांना तगडे आव्हान कसे मिळणार तर त्याचे उत्तर भाजपने नरेंद्र पाटील यांच्या रूपाने दिले. राष्ट्रवादी व भाजपचा प्रवास करून शिवसेनेत दाखल झालेले पाटील मुख्यमंत्र्यांनीच सेनेच्या झोळीत टाकले. सातारा जिल्ह्यात माथाडींची ताकत लक्षात घेता भाजप व सेना युतीने नरेंद्र पाटलांचे कार्ड अचानक पुढे आणल्याने माढ्याबरोबर सातारा लोकसभा मतदारसंघात राजकीय चुरस निर्माण झाली.

राजकीय खेळ्यांनी मैदान तापले

पाटलांनी येथील हॉटेल चंद्रविलासवर आमदार शिवेंद्रराजेंबरोबर केलेली मिसळं डिप्लोमसी राज्यभर गाजली. सुरूचीवर जाऊन पाटलांनी आमदार शिवेंद्रराजे यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले. यानिमित्ताने पाटलांनी राष्ट्रवादीच्या तंबूत जो मेसेज सोडायचा तो सोडलाच. या राजकीय खेळीला उदयनराजे यांनी सुद्धा उत्तर दिले. नरेंद्र पाटील यांचे बंधू रमेश पाटील यांच्याबरोबर पाटणमध्ये डिनर डिप्लोमसी केली. पाटील यांच्या मातोश्री आजारपणामुळे कराडात ऍडमिट होत्या. तेथे उदयनराजे यांनी भेट देऊन आरपारची राजकीय लढाई भावनिक करण्याचा प्रयत्न केला. साताऱ्याच्या विकासाचा जाहीरनामा कोणत्याच पक्षाने न देता वैयक्तिक उखाळ्यापाकाळ्यांनी निवडणूक गाजली. आम्ही विचारलेल्या ते वीस प्रश्‍नांची उदयनराजे यांनी शुध्दीत उत्तरे द्यावीत असे थेट आव्हान नरेंद्र पाटील यांनी दिले. तर माथाडींच्या घरकुल वाटपात 51 लाखांचा घोटाळा झाल्याचा आरोप राजे गटाने करत नरेंद्र पाटील यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.

राष्ट्रवादीची प्रतिष्ठा पणाला

सातारा व माढा या दोन्ही लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीची पर्यायाने थोरल्या पवारांची प्रतिष्ठा नक्कीच पणाला लागली आहे. पक्षांच्या स्टार प्रचारकांनीही साताऱ्यात जो एकमेकांवर पलटवार केला त्यामध्ये भाजप व राष्ट्रवादीतला राजकीय संघर्ष अगदीच टोकदार झाला. राज ठाकरे यांनी “ए लाव रे तो व्हिडिओ’ हा हुकुमी एक्का चालवत गांधी मैदानावरच भाजपचे पुरते वस्त्रहरणं केले. याच गांधी मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे म्हणजे बंद पडलेले इंजिन अशी शेरेबाजी करतं राज ठाकरे यांच्यावर पलटवार केला. जिल्हा परिषदेच्या मैदानावर राष्ट्रवादीच्या सांगता सभेत ग्राम्य शैलीतला हिणकसं टोला थोरल्या पवारांनी भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा यांना लगावला. प्रचार तंत्राचे आणि त्या अनुषंगाने होणाऱ्या आरोपांचे दर्शन सातारकरांना झाले. उदयनराजे यांनी मतदानाच्या पूर्वसंध्येला मी तुमचाच असे मतदारराजाला सांगत भावनिकतेच्या लाटेवर स्वार होण्याचा प्रयत्न केला.

प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी दुपारी तीन नंतर एकूण मतदानाची सरासरी साठीच्या घराकडे सरकू लागल्याने दोन्ही बाजूच्या राजकीय खेम्यात गहमागहमी सुरू झाली. भाजपने खास काही माध्यमातून वाढत्या टक्केवारीवर बारीक लक्ष ठेवले होते ते थेट कराडातून. दीपक बापू पवार हे सुद्धा साताऱ्यात पाटलांच्यावतीने तळ ठोकून होते. उदयनराजे भोसले यांच्यासह कुटुंबीयांनी मतदान केल्यानंतर राजेंची फोर्ड गाडी सुद्धा जलमंदिर ते रजताद्री व्हाया पोवई नाका करत साताऱ्यात फिरू लागली. उन्हाचा चढलेला पारा आणि राजकीय धामधुमीचा उष्मा यामध्ये सातारकरांचा घामटा निघाला. मात्र सातारकरांनी शांत डोक्‍याने कोणाला खासदारकी दिली या प्रश्‍नाने राजकीय वर्तुळाची धाकधूक निश्‍चित वाढली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)