ईव्हीएम बंद पडल्याने ताटकळले मतदार

मतदानास दोन तास उशिराने प्रारंभ ः अनेक मतदार मतदाना विनाच परतले

जामखेड – जामखेड तालुक्‍यात सकाळी मतदानास सुरुवात होताच अनेक ठिकाणी मतदान यंत्रांत तांत्रिक बिघाडाचे प्रकार समोर आले. मतदान यंत्र पुन्हा सुरू होण्यास नान्नज येथे उशीर झाल्याने तब्बल दोन तास उशिरा मतदानास सुरूवात झाली. मतदारांना मतदान केंद्रांवर दोन-दोन तास उन्हात ताटकळत उभे राहावे लागले. त्यामुळे अनेक मतदार मतदान न करताच परत गेले. निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ यानिमित्ताने समोर आला. तालुक्‍यात 142 मतदान केंद्रांवर किरकोळ प्रकार वगळता शांततेत मतदान झाले.

जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी आपल्या कुटुंबीयांसह चौंडी या आपल्या गावी मतदानाचा हक्क बजावला. तालुक्‍यातील अनेक गावांमध्ये उन्हातच मतदानासाठी मतदार येत होते. काही ठिकाणी मतदारांनी ऊन उतरल्यानंतर मतदानकेंद्रांवर गर्दी केली होती. नवमतदारांनीही मोठ्या उत्साहात मतदान केंद्रांवर हजेरी लावल्याचे दिसत होते. विशेषतः महिला वर्ग मतदानासाठी मोठ्या प्रमाणात बाहेर पडला होता.

दरम्यान पिंपरखेड, बोर्ले, मुंगेवाडी, सोनेगाव व जामखेड शहरातल्या जिल्हा परिषद मराठी शाळेत मतदानयंत्र बिघाडाच्या घटना दोन वेळा घडल्या. मतदानयंत्रातील बिघाड दुरुस्त करण्यासाठी निवडणूक आयोगाची एक टीम कार्यरत होती. मात्र अनेक ठिकाणी यंत्रात बिघाड होत असल्याने या टीमच्या अडचणी वाढत होत्या. अनेक ठिकाणी वयोवृद्धांचे मतदान घडवून आणण्यासाठी तरुणांनी, वृद्धांनी मतदान करून देण्यासाठी मतदान कक्ष अधिकाऱ्यांशी वादावादी केली. जामखेड येथील ल. ना. होशिंग विद्यालयातील मतदान केंद्र क्र. 106 मध्ये निवडणूक आयोगाचे सखी मतदान केंद्र होते.

हे केंद्र फुग्यांनी आकर्षक पध्दतीने सजवण्यात आले होते. या केंद्रावर सकाळी मोठा उत्साह दिसून आला. दुपारी शुकशुकाट होता. ग्रामीण भागातही ज्येष्ठांनी सकाळीच मतदान केले. शेतकरी व महिला संतप्त होऊन मतदान केंद्रांतून निघून जात होते. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी तहसीलदार विशाल नाईकवाडे व पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार आपल्या टीमसह परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून होते.

तरुणाने केले महिलेचे परस्पर मतदान

तालुक्‍यातील एका केंद्रावर एका महिलेचे मतदान करण्यासंदर्भात तरुण हट्ट करत होता. त्या महिलेला चालता येत नसल्याचे त्याने सांगितले. परंतु काही वेळानंतर ती महिला मतदान कक्षात आली. तोपर्यंत तरुणांच्या एका गटाने त्या महिलेचे मतदान केले होते. त्यामुळे त्या महिलेला मतदाना विनाच परतावे लागले. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दाखवलेल्या या बेफिकीरीमुळे पोलिंग एजंटमध्ये किरकोळ वादावादी झाली.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.