नोकरी सोडताना पीएफमधील पैसे काढताय?

खासगी क्षेत्रात बदलत्या काळानुसार नोकरी बदलण्याचा ट्रेंड हा जुनाच आहे. मात्र नोकरी बदलण्याबरोबरच जुन्या कंपनीतील पीएफचे पैसे काढून घेणे हा तोट्याचा व्यवहार ठरू शकतो. यातून आपल्या चांगल्या भविष्यासाठी होणारी बचत मध्येच थांबते तसेच पेन्शन योजनेतील सातत्यदेखील संपुष्टात येते.

कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पीएफचा मोठा आर्थिक आधार मानला जातो. साधारणपणे 30 ते 35 वर्षाच्या सेवेनंतर कर्मचाऱ्याला पीएफच्या रुपाने चांगली रक्कम हातात पडते. काही मंडळी आपत्कालिन स्थितीत पीएफचे पैसे काढतात. परंतु यादरम्यान खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला नोकरी बदलण्याची वेळ आली तर काहीजण संपूर्ण पीएफ काढतात तर काही नव्या कंपनीत स्थानांतरित करतात. तज्ज्ञांच्या मते, खासगी क्षेत्रात काही जण वेतनवाढीसाठी, बदल करण्यासाठी किंवा अन्य कारणामुळे नोकरी सोडतात किंवा अन्य कारणावरून त्यांना काढून टाकले जाते. मात्र अशा स्थितीत तात्काळ पीएफ काढून घेणे हे योग्य नाही. जोपर्यंत आपल्याला गरज भासत नाही, तोपर्यंत पीएफ काढण्याचा विचार करू नये. नोकरी सोडल्यानंतरही त्यावर व्याज मिळत राहते. तसेच नवीन रोजगार मिळाल्यानंतर तो पीएफ नव्या कंपनीतही स्थानांतरित करता येतो. जर पहिली नोकरी सोडून दुसरी नोकरी काही महिन्यांनी सुरू केली तरी पीएफची संपूर्ण रक्कम नव्या कंपनीत स्थानांतरित करता येते. यातून सेवेत सातत्य मानले जाते. आणि त्याचवेळी पेन्शन योजनेतही अडथळा येणार नाही.

पाच वर्षांच्या आत पीएफ काढल्यास
पीएफ जर पाच वर्षाच्या सेवेअगोदरच काढला तर त्यावर टीडीएस आकारला जातो. अर्थात टीडीएस हा रक्कमेवर अवलंबून आहे. आता 40 हजार रुपयांर्पंतचा परतावा करमुक्त आहे. आजारपण किंवा कंपनी बंद पडल्याने पीएफ काढून घेतला जात असेल तर त्यावर कर आकारला जाणार नाही.

निवृत्तीनंतरही व्याज मिळते
जर आपण निवृत्तीनंतरही पीएफचे पैसे काढले नाही तर तीन वर्षापर्यंत व्याज मिळत राहील. तीन वर्षानंतर ते खाते निष्क्रिय मानले जाते. बहुतांश मंडळी पीएफची रक्कम ही सुरक्षित भवितव्यासाठी राखून ठेवतात. तसेच करमुक्ती असल्याने हा एक चांगला पर्याय मानला जातो. म्हणूनच अधिकाधिक काळ पीएफ असणे ही चांगली बाब आहे.

पैसे काढताना केवायसी आवश्‍यक
जर आपल्याला गरजेसाठी पैसे काढायचे असतील तर केवायसी असणे आवश्‍यक आहे. जर एखादा व्यक्ती दोन महिन्यांपर्यंत बेरोजगार राहत असेल तर पीएफचे संपूर्ण पैसे काढू शकतो. नोकरी सोडल्यानंतर एक महिन्याच्या आत 75 टक्के रक्कम काढता येते. जर सेवाकाळ दहा वर्षापेक्षा कमी असेल तर पेन्शनचा संपूर्ण पैसा देखील काढता येतो. सामान्यपणे पीएफचे संपूर्ण पैसे हे वयाच्या 58 वर्षानंतर सेवानिवृत्तीनंतर काढता येतात.

– सुभाष वैद्य

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)