आता ऑनलाइन “डॉक्‍युमेंट’ पाठविता येणार

दस्त नोंदणी प्रक्रिया अधिक सुलभ : नागरिकांचा वेळ वाचणार
पुणे – नोंदणी व मुद्रांक विभागाने दस्त नोंदणीची प्रक्रिया अधिक सुलभ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार खरेदी-विक्रीचे दस्ताऐवज नोंदणी करण्याच्या आधी दुय्यम निबंधक कार्यालयाकडे ऑनलाइन पद्धतीने पाठविता येणार आहे.

या दस्तामध्ये काही त्रुटी नसल्यास संबंधित दस्त नोंदणीसाठी नागरिकांना बोलविण्यात येणार असून त्यावेळी सर्व दस्ताऐवज स्कॅन करण्याची गरज राहणार नसून फक्‍त शेवटच्या पानावर नागरिकांच्या सह्या करून ते पान स्कॅन केले जाणार आहे. यावर डिजिटल स्वाक्षरी असणार आहे. या सुविधेमुळे दस्त नोंदणीनंतर दस्ताऐवज स्कॅन करण्यासाठीचा वेळ वाचणार आहे. तसेच, आपला दस्त नोंदविला जाणार आहे की नाही याची माहितीही नागरिकांना आधी समजणार आहे.

अधिकाधिक सुविधा ऑनलाइन पद्धतीने देण्यावर नोंदणी व मुद्रांक विभागाचा भर आहे. त्यानुसार दस्त नोंदणी, जुने दस्ताऐवज शोधणे, मुद्रांक शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरणे आदी सुविधांचा यामध्ये समावेश आहे. आता दस्त नोंदणीच्या प्रक्रियेमधील दस्ताऐवज स्कॅन करण्यासाठीचा लागणारा वेळ कमी करण्यास प्राधान्य दिले आहे. त्यानुसार दस्त नोंदणी करण्याचा दस्ताऐवज पीडीएफमध्ये संबंधित दुय्यम निबंधक यांना ई-मेलद्वारे पाठविणे आवश्‍यक आहे. त्यानंतर दुय्यम निबंधक या दस्ताऐवजाची तपासणी करून त्यामध्ये काही त्रुटी आढळल्यास त्याची माहिती संबंधित नागरिकाला देण्यात येईल.

या त्रुटीची पूर्तताही या ऑनलाइन पद्धतीने करायची असून त्यानंतर दस्त नोंदणीसाठी नागरिकांना कार्यालयात जावे लागणार आहे. यावेळी दस्ताऐवजातील शेवटच्या पानाची प्रिट काढून त्यावर खरेदी-विक्री करणाऱ्या व्यक्‍तींच्या स्वाक्षरी घेतली जाणार आहे. यानंतर हे एकच पान स्कॅन करावे लागणार आहे. या दस्ताऐवजावरही डिजिटल स्वाक्षरी असणार आहे. या नवीन सुविधेमुळे दस्त नोंदणीनंतर स्कॅन करण्यासाठी लागणारा वेळ कमी होणार आहे.

दस्ताऐवज ऑनलाईन पध्दतीने पीडीएफमध्ये दुय्यम निबंधक कार्यालयात पाठविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे दस्त नोंदणीनंतर स्कॅनींगसाठी लागणारा वेळ वाचणार आहे. राज्यभरातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

– अनिल कवडे, राज्याचे नोंदणी महानिरिक्षक 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)