एनबीएफसींनी जोखीम अधिकारी नेमावा -रिझर्व्ह बॅंक

रिझर्व्ह बॅंकेची बिगर बॅंकिंग वित्तीय संस्थांना सूचना, अधिकारी व्यवस्थापकीय संचालकांना जबाबदार असावा

मुंबई – देशातील कार्यरत बिगर बॅंकिंग वित्तीय संस्थांनी (एपबीएफसी) शक्‍य तितक्‍या लवकर पुरेसा व्यावसायिक अनुभव असलेल्या मुख्य जोखीम अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची गरज आहे. या संस्थांनी अशा नियुक्‍त्या करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असे रिझर्व्ह बॅंकेने म्हटले आहे.

ज्या संस्थांचे मालमत्ता व्यवस्थापन पाच हजार कोटी रुपयांच्या पुढे आहे, अशा संस्थांनी मुख्य जोखीम अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी असे रिझर्व्ह बॅंकेने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. गेल्या काही दिवसापासून भांडवल वितरण क्षेत्रातील एनबीएफसीची भूमिका वाढली आहे. त्याचबरोबर काही संस्थांच्या कामकाजाबाबत वादग्रस्तता निर्माण झालेली आहे. या पार्श्‍वभूमीवर रिझर्व्ह बॅंकेने जारी केलेल्या परिपत्रकाला महत्त्व देण्यात येत आहे.

या अधिकाऱ्याची नियुक्‍ती कंपन्यांच्या संचालक मंडळाद्वारा होणे अपेक्षित आहे. तसेच त्यांचा कार्यकाल निश्‍चित करण्याची गरज असल्याचे रिझर्व्ह बॅंकेने म्हटले आहे. या अधिकाऱ्याकडे त्या क्षेत्रातील पुरेसा अनुभव असावा याची दक्षता घ्यावी.
या अधिकाऱ्याचा कार्यकाळ संपल्यानंतर संचालक मंडळाच्या परवानगीने जर एनबीएफसी शेअरबाजारावर नोंदलेली असेल तर या संदर्भातील माहिती शेअरबाजारांना कळविण्यात यावी.

त्याचबरोबर या अधिकाऱ्याला स्वतंत्रपणे आणि निर्भयपणे काम करता यावे याकरिता आवश्‍यक नियमावली तयार करावी. हा अधिकारी आपला अहवाल थेट व्यवस्थापकीय संचालक किंवा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देणे अपेक्षित आहे. या संस्थांनी जोखीम अधिकाऱ्याला इतर कुठलेही काम देऊ नये, अशी सूचना बॅंकेने केली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)