“इंटरसिटी’ची डबल इंजिन दुसरी चाचणी

पुणे – मुंबई-पुणे-मुंबई मार्गावर धावणाऱ्या इंटरसिटी एक्‍स्प्रेसचा वेग वाढविण्यासाठी रेल्वेकडून घेण्यात आलेली पहिल्या टप्प्यातील चाचणी यशस्वी झाली आहे. त्या चाचणीनंतर आता मध्य रेल्वेकडून दुसऱ्या टप्प्यातील चाचणी घेण्यात येणार आहे. दि. 31 मे ते 6 जून या कालावधीमध्ये “पुश ऍन्ड पुल’ प्रकारे दोन इंजिन जोडून ही चाचणी घेण्यात येणार असून यामुळे प्रवाशांचा 35 मिनिटांचा वेळ वाचणार आहे. या चाचणीसाठी गाडीच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

इंटरसिटीचा वेग वाढविणे, मुंबई-पुणे आणि पुणे-मुंबई येथे प्रवास करण्यासाठी वेळेची बचत व्हावी, प्रवाशांना कमी वेळेत इच्छित स्थळी पोहोचता यावे, यासाठी मध्य रेल्वेने इंटरसिटी एक्‍स्प्रेसचा वेग वाढविण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी गेल्या आठ दिवसांपूर्वी या गाडीला दोन्ही बाजूने इंजिन जोडून “पुश ऍन्ड पूल’ या प्रकारे तिची चाचणी घेतली होती. यामुळे इंटरसिटीला इंजिन जोडण्यासाठी कर्जत येथील रेल्वे यार्डमध्ये थांबविण्याची गरज नाही. इंजिन बदलण्यासाठीच्या 20 मिनिटांची बचत होणार आहे. त्याचबरोबर समोरच्या इंजिनला “पूश’ करणाऱ्या मागच्या बाजूच्या इंजिनची ऊर्जा मिळत असल्याने लोणावळा येथील घाट सेक्‍शनमध्येही इंटरसिटी वेगाने धावणार आहे. पूर्वी ही गाडी तीन ते साडेतीन तासांत पुणे-मुंबई प्रवास करत होती. आता ती दोन तास 35 मिनिटांत हे अंतर पार करणार आहे.

गाडीचे नव्याने वेळापत्रक
इंटरसिटी एक्‍स्प्रेस मुंबईहून (सीएसटी) सकाळी 6 वाजून 40 मिनिटांनी निघून पुण्यात सकाळी 9 वाजून 57 मिनिटांनी पोहोचत होती. नव्या वेळापत्रकानुसार ही गाडी मुंबईहून 6 वाजून 45 मिनिटांनी निघणार असून सकाळी 9 वाजून 20 मिनिटांनी पोहोचणार आहे. पुणे स्थानकातून सायंकाळी 5 वाजून 55 मिनिटांनी सुटणारी गाडी रात्री 9 वाजून 5 मिनिटांनी मुंबई येथे पोहोचत होती. मात्र, ती आता पुण्याहून सायंकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी निघणार असून रात्री 9 वाजून 5 मिनिटांनी मुंबई स्थानकात दाखल होणार आहे. या वेळापत्रकाचा अन्य कोणत्याही गाड्यांवर परिणाम न झाल्यास या वेळापत्रकाची नियमित अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)