स्फूर्तिदायी लाल महाल

‘पुनवडी ते पुणे’ ही अनोखी परंपरा आणि ऐतिहासिक वास्तू असणाऱ्या शहराच्या वैभवामध्ये भर घालतात. पुणे शहराला वाडे, मंदिरे, टेकड्या आदींचा स्वतंत्र इतिहास आहे. पेशवेकालीन इतिहासाबरोबरच शहराला शिवकालीन इतिहासाची परंपरा आहे. शनिवारवाडा आणि कसबा गणपती मंदिराच्या जवळ असणारी “लाल महाल’ ही ऐतिहासिक वास्तू शहराच्या गजबजलेल्या परिसरात दिमाखात उभी आहे. शिवाजी रस्त्यालालागून असणाऱ्या वास्तूची पुणे महानगरपालिकेकडून पुनर्रचना केली आहे. लाल महालाला दर महिन्याला शेकडो पर्यटक भेट देतात. शहराच्या मधोमध असणाऱ्या या ठिकाणाचा समावेश “पुणे दर्शन’मध्ये करण्यात आला आहे.

सध्या दिमाखात उभी असणारी “लाल महाल’ ही वास्तू पुणे महानगरपालिकेने उभारली आहे. या वास्तूच्या सुरुवातीलाच महानगरपालिकेने बाल शिवाजी, जिजाऊंचे शिल्प उभारले आहे. त्याचबरोबर लाल महालामध्ये साकारण्यात आलेल्या “शिवचित्र सृष्टी’मुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पर्यटकांना सहजतेने उलगडत होता. लाल महालामध्ये प्रवेश केल्यानंतर दिसणारा जिजाऊंचा अर्धपुतळा नागरिकांसाठी स्फूर्तिदायी आहे. या ठिकाणी प्रत्येक जण नतमस्तक होतो.

लाल महालामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे वास्तव होते. या महालाला अंगावर शहारे उभे करणारा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांसह मध्यरात्री शाहिस्तेखानाची बोटे छाटल्याचा इतिहास परंपरेची साक्ष देतो.

“शाहिस्तेखानाने दिल्लीतून फौज घेऊन पुणे उद्‌ध्वस्त करण्यास सुरुवात केली होती. प्रजेला त्रास देणे सुरू केले. परिणामी, छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानास धडा शिकविण्यासाठी अनोख्या युक्‍तींचा वापर केला. निवडक मावळ्यांना सोबत घेऊन महाराज शिताफीने लालमहालामध्ये शिरले. महाराजांच्या शिताफीमुळे शाहिस्तेखानाची धांदल उडाली.
त्यानंतर शाहिस्तेखानाची फौज आणि शिवरायांच्या मावळ्यांमध्ये लढाई झाली आणि या दरम्यान महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटे छाटली’, असा इतिहास लालमहालाबाबत सांगण्यात येतो.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here