‘चिखलफेकी’नंतर आता ‘असा’ करणार प्रशासनाच्या मग्रुरीवर इलाज – नितेश राणे

कणकवली – मुंबई-गोवा महामार्गावरीत खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत असल्यानं नितेश राणेंनी आज आंदोलन केलं होतं. मात्र यावेळी आमदार नितेश राणे, नगराध्यक्ष समीर नलावडे आणि स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उप-अभियंत्याला गडनदी पुलावर बांधून त्यांच्या डोक्यावर चिखलाच्या बादल्या ओतल्याने एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

अशातच आता काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी सदर प्रकरणी आणखीनच तीव्र भूमिका घेतली आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार नितेश राणे याप्रकरणी बोलताना म्हणाले की, “आता मी स्वतःच द्रुतगती मार्गाच्या दुरुस्तीच्या कामावर जातीने लक्ष ठेवणार आहे. मी रोज सकाळी ७ वाजता हातात दांडके घेऊन दुरुस्ती कामावर नजर ठेवण्यासाठी उपस्थित राहणार आहे. शासकीय व्यवस्था जर मग्रुरी दाखवत असेल तर आमच्याकडेही त्यांना वठणीवर आणण्याचे औषध आहे.”

दरम्यान, नितेश राणे यांचे वडील तथा राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी सदर कृत्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलताना नारायण राणे यांनी, “कोणत्याही अधिकाऱ्यासोबत अशाप्रकारचे वर्तन करणे अत्यंत चुकीचे असून नितेश राणे आणि त्यांच्या समर्थकांची सदर कृती निंदनीय आहे. द्रुतगती मार्गाबाबतचे आंदोलन जरी योग्य असले तरी त्यांनी केलेल्या कृतीचे मी किंचितही समर्थन करत नाही. वडील या नात्याने मी नितेश राणे यांना याप्रकरणी माफी मागण्यास सांगणार आहे.” अशी भूमिका मांडली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here