पॅरिस – लाल मातीवरील बादशहा म्हणुन ओळखला जाणारा राफेल नदाल व ग्रॅंड स्लॅम स्पर्धांचा सम्राट अशी ओळख असलेला रॉजर फेडरर या दोन बलाढ्य खेळाडुंमध्ये येथे फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीचा सामना होणार आहे. शुक्रवारी होणारी ही लढत प्रेक्षकांसाठी मेजवानी ठरणार आहे.
या स्पर्धेत नदाल याने आतापर्यंत अकरा वेळा विजेतेपद मिळविले आहे. रोलॅंड गॅरोस मॅदानावर नदाल याने वर्चस्व गाजविले आहे. त्याने क्लेकोर्टवर फेडररविरुध्द झालेल्या पंधरा सामन्यांमध्ये तेरा वेळा विजय मिळविला आहे. क्लेकोर्टवर फेडरर याची कामगिरी फारशी चांगली झालेली नाही. त्याने ग्रॅंड स्लॅम स्पर्धांमध्ये वीस वेळा अजिंक्यपद मिळविले असले तरी या स्पर्धेत केवळ एकदा त्याला विजेतेपद मिळविता आले आहे. यंदा त्याने आतापर्यंत केवळ एकदाच सेट गमाविला आहे.
चार वर्षांनंतर तो या स्पर्धेत सहभागी झाला आहे. या स्पर्धेसाठी त्याने भरपुर सराव केला आहे. बर्फाळ हवामानात त्याने हा सराव केला आहे. त्याने उपांत्यपुर्व फेरीत स्टॅनिस्लास वावरिन्क याचा 7-6 (7-4), 4-6, 7-6 (7-5), 6-4 असा पराभव करताना वयाच्या 37 व्या वर्षी आपण अव्वल दर्जाचा खेळ करु शकतो याचा प्रत्यय दाखविला आहे. या सामन्याविषयी तो म्हणाला, स्टॅन याने खुपच ताकदवान फटके मारले. तो जिगरबाज खेळाडु आहे. दुसऱ्या सेटमध्ये मला परतीच्या फटक्यांवर नियंत्रण ठेवता आले नाही. तथापी नंतर मी खेळावर नियंत्रण मिळविले.
क्लेकोर्टॅवर नदाल हा 33 वर्षीय खेळाडु अतिशय ताकदवान फटके मारण्याबाबत माहीर आहे. विशेषत फोरहॅड व बॅकहॅंडचे वेगवान फटके हे त्याचे प्रभावी अस्त्र मानले जाते. त्याने येथील उपांत्यपुर्व फेरीत जपानचा लढवय्या खेळाडु केई निशिकोरी याची 6-1, 6-1, 6-3 अशी धुळधाण उडविली आहे. त्याने ही लढत एकतर्फी जिंकुन फेडरर याच्यापुढे कडवे आव्हान निर्माण् केले आहे. या सामन्यात त्याने केलेला झंझावती खेळ चाहत्यांसाठी आनंददायी ठरला आहे.
फेडररविरुध्द् होणाऱ्या लढतीबाबत तो म्हणाला, या लढतीची मी आतुरतेने वाट पाहत आहे. उपांत्य फेरीत त्याचे आव्हान असणार याची मी मानसिक तयारी केली होती. त्याच्याविरुध्द् खेळण्यासारखा दुसरा आनंद नाही. त्याच्या खेळाचा मला भरपुर अभ्यास आहे. माझ्यावर कोणतेही दडपण नाही. विजेतेपद मिळविण्यासाठी मी उतरलो आहे. मी शंभर टक्के तंदुरुस्त आहे.
नदालबाबत फेडरर याने सांगितले, कोर्टवर आम्ही प्रतिस्पर्धी असलो तरी आम्ही मित्र आहोत. त्याच्याविषयी मला कमालीचा आदर आहे. क्ले कोर्टवर तो अतुलनीय खेळाडु आहे. यंदा क्ले कोर्टवर भरपुर सराव केला आहे. बॅकहॅंड फटक्यांबाबत असलेला कमकुवतपणा दुर करण्यासाठी विशेष भर दिला आहे. शेवटपर्यंत त्याला चिवट झुंज देण्याची माझी तयारी आहे.