शेतकऱ्यांच्या भाळी दुष्काळगाथा

इंदापूर तालुक्‍यातील 22 गावे अजूनही तहानलेली : जुलै महिन्यातही पावसाची आस

निमसाखर – इंदापूर तालुक्‍याच्या पश्‍चिम पट्टयातील अनेक गावांत वरुणराजाने रुसवा धरल्यामुळे ग्रामस्थ व शेतकरी हवालदिल झाले आहेत. सध्या या भागातील अद्यापही नीरा नदी, सार्वजनिक विहीरी, तलाव कोरडेच आहेत. परंतु दुष्काळी परिस्थितीमुळे सहा जनावरांच्या छावण्या सुरु आहेत. आषाढ महिन्यात तरी दमदार पाऊस होईल का, दुष्काळसदृश्‍य परिस्थितीचा सामना करावा लागतोय, याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.

सध्या कधी ढगांची दाटी तर कधी कडक ऊन, पहाटेच्या वेळी हुडहुडी या वातावरणाचा फटका नागरिकांना बसत आहे. त्यामुळे शेतकरी व ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत.अनेक नक्षत्र आली आणि गेली. हलक्‍या सरी वगळता समाधानकारक पाऊस भागात झालाच नाही. त्यामुळे गेली तीन महिन्यांपूर्वीच भागातील उन्हाळी हंगामातील पिके जळून गेली आहेत. सध्या खरीप हंगामातील पेरण्या अद्यापही रखडलेल्या आहेत. भागातील रासायनिक खते व बियाण्यांची दुकाने अद्यापही ओसाड पडली आहेत.

इंदापूर तालुक्‍याच्या पश्‍चिम पट्टयातील निरवांगी, निमसाखर, दगडवाडी, सराफवाडी, घोरपडवाडी, खोरोचीसह अन्य भागात दुष्काळजन्य परिस्थितीमुळे बिकट परिस्थिती दिसत आहे. या भागासाठी सुमारे 50 ते 60 किलोमीटर अंतर पाणी उपलब्ध होत आहे. या ठिकाणावरून टॅंकरने पाणीपुरवठा होत आहे, तरी ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.

अनेक गावांमधील सार्वजनिक पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरी कोरड्या पडल्याचे चित्र आहे. गावांना पाणीपुरवठा करणारा दगडवाडीचा तलाव, सराफवाडीनजीकचा सुमारे चार गावांना वाघाळे येथील तलावाच्या माध्यमातून पाणीपुरवठा होतो. मात्र, हा तलाव सहा महिन्यांपासून कोरडा पडला आहे. निरवांगी, शिसटवाडी, रेडणी येथे दोन तर नीरा भीमा कारखान्यावर एक अशा छावण्या सुरु कराव्या लागल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय असलेल्यज्ञा दुग्ध व्यवसायाला दृष्काळाची झळ सोसावी लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण धोक्‍यात आले आहे. मात्र, परिसरातील जनावरांच्या छावण्यांमुळे शेतकऱ्यांची सोय झाल्याने ग्रामस्थांना थोडाफार दिलासा मिळाला आहे.

शेतीपूरक व्यवसायांना कोटींचा फटका
इंदापूर तालुक्‍यात 46 गावांत 69 टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. जून महिना कोरडा गेल्यानंतर पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यानंतर जुलै महिन्यात दमदार पाऊस झाला. परंतु खरीप हंगामावर अजूनही टांगती तलवार आहे. जुलै महिना उजाडला तरी टॅंकर आणि चारा छावण्या सुरू असल्यामुळे दुष्काळाची दाहकता वाढली आहे. दुष्काळ निवारणासाठी लोकप्रतिनिधींकडून जुजबी कार्यवाही केली जात आहे. त्याचा परिणाम शेतीपूरक अर्थकारणावर होत आहे. शेतीपूरक कृषि सेवा केंद्र, खत विक्री, अवजार विक्री आदी व्यवसायांना कोट्यवधी रूपयांचा फटका बसला आहे.

तलाव भरून देण्याची गरज
इंदापूर तालुक्‍यातील 22 गावांसह अन्य गावांमध्ये दुष्काळजन्य भयानक परिस्थिती आहे. टॅंकरने पिण्यासाठी दूरवरून पाणी आणून वितरित केले जात आहे. त्यामुळे नागरिकांना पावसाळ्यात पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. सध्या वीर धरणात बऱ्यापैकी पाणीसाठा आहे. सध्या तातडीची गरज म्हणून नीरा नदीत पाणी सोडावे. याचबरोबर लोकप्रतिनिधींनी दबाव आणून तालुक्‍यातील पिण्याचे तलाव तातडीने जलसंपदा विभागाच्या माध्यमातून भरून द्यावे, अशी मागणी निरवांगी गावचे उपसरपंच शंकर शेंडे व सुहास गुरव यांनी केली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)