उत्सव परवाना 5 दिवसांत

संग्रहित छायाचित्र

ऑनलाइन अर्जप्रणाली सुरू: गणेश मंडळांसह महापालिकेची बैठक
नवीन संकेतस्थळाचे पदाधिकाऱ्यांसमोर सादरीकरण

पुणे – न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार गणेश मंडळांना ऑनलाइन अथवा ऑफलाइन अर्ज केल्यानंतर पुढील पाच दिवसांत परवाना देण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने शनिवारी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना दिली.
गणेशोत्सव परवाने मंडळांना तातडीने देण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा महापालिका आणि पोलिसांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे. या संकेतस्थळाची माहिती देण्यासाठी शनिवारी दुपारी बैठक बोलविण्यात आली होती. यावेळी मंडळांनी वेगवेगळे प्रश्‍न उपस्थित केले. महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त डॉ. विपीन शर्मा, शांतनू गोयल, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख, विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त मितेश गट्टे, सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र रसाळ, अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांच्यासह संबंधित विभागांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.
बैठकीत संकेतस्थळाचे सादरीकरण करण्यात आले. त्यात प्रामुख्याने मंडळांनी कशा प्रकारे अर्ज करावेत, कागदपत्रांची पूर्ताता कशा प्रकारे करावी याची माहिती देण्यात आली. त्यानंतर उपस्थित मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी त्याला प्रतिसाद देत आपल्या शंका विचारल्या. त्यावर प्रशासनाकडून सर्व प्रकारचा खुलासा करण्यात आला. दरम्यान, महापालिकेच्या माध्यमातून पोलिसांनी सुरू केलेले हे संकेतस्थळ इंग्रजीत असून ते मराठीत उपलब्ध करून देण्यासह, ज्या मंडळांची कागदपत्रे योग्य असतील तसेच त्यांच्या मांडवाच्या ठिकाणी कधीच बदल होत नसल्यास त्यांना पाच वर्षे परवाना देण्याची मागणी मंडळांकडून यावेळी करण्यात आली.

गणेश मंडळांच्या मुख्य मागण्या
पालिकेने चारऐवजी जाहिरातींसाठी सहा कमानी द्याव्यात.
खड्डे दुरुस्ती स्थानिक नगरसेवकांच्या निधीतून करावी.
परवाना देताना कागदपत्रे अपुरी असल्यास मंडळांना फोन अथवा मेसेजद्वारे माहिती द्यावी.
शासकीय सुट्टीच्या दिवशीही परवाना देणे सुरूच ठेवावे.
बाहेरून शहरात येऊन ध्वनी प्रदूषण करणाऱ्या स्पीकरवर बंदी घालावी.
गणेश मंडळाच्या परिसरात मोबाइल टॉयलेट सुविधा द्यावी.

गणेशोत्सव केवळ गणेशभक्तांचा नाही, तर अधिकाऱ्यांचाही आहे. त्यामुळे अधिकारी व कार्यकर्ते यांच्यात संवाद व समन्वय गरजेचा आहे. न्यायालयाच्या सूचनांची अंमलबजावणी करण्याचे काम आमच्यावर सोपविले आहे. निर्देशांनुसारच आपणास उत्सव साजरा करायचा आहे. – मितेश गट्टे, पोलीस उपायुक्त, विशेष शाखा.

स्वच्छता, पाणीपुरवठा, हरित गणेशोत्सव साजरा होणे पालिकेची जबाबदारी आहे. कमानींसंदर्भात सर्वांनी नियमांचे पालन करावे. यंदाही रात्रीच्यावेळी स्वच्छता केली जाणार आहे. अधिकारीही मंडळांना भेटी देणार आहेत. विसर्जन घाटांची संख्या वाढवली जाणार आहे. गणेशमूर्तींचे विसर्जन हौदांमध्ये करावे किंवा मूर्ती दान करावी, अशी विनंती यंदाही केली जाणार आहे. पर्यावरण व जनजागृतीचे कार्यक्रमही घेतले जाणार आहेत.
– सौरभ राव,  आयुक्त, महापालिका.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)