लक्षवेधी : कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे एकीकरण काळाची गरज

-अॅड. बाळ आडकर

महाराष्ट्रापुरता विचार करावयाचा झाल्यास सध्याची स्थिती कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांचे विलीनीकरणास अत्यंत अनुकूल अशी आहे. विद्यमान विधानसभेतील संख्याबळाचा विचार करता दोन्हीही पक्ष साधारणपणे समान पातळीवर आहेत, असे म्हणता येईल. “राष्ट्रवादी’ ही कॉंग्रेस संस्कृतीला मानणारी आहे. विदेशी नेतृत्वाचा मुद्दा आता गौण झाला आहे. राष्ट्रवादीत शरद पवारांचे नेतृत्व खंबीर आहे. देशातील राजकारणातही त्यांचा दबदबा आहे. त्यांना राजकारणातील “चाणक्‍य’ असे संबोधले जाते.

लोकसभेच्या 2014 च्या निवडणुकीत “भाजपने स्वबळावर सत्ता हस्तगत केली. खरोखरच ही “मोदी लाट’ होती. सरकार तसेच पक्षावर मोदी यांनी मजबूत पकड मिळविली. 2019 च्या निवडणुकीत “मोदी लाट’ ओसरली असली तरी त्यांच्या झंझावाती प्रचाराने सारा भारत ढवळून काढला. विकास या मुद्द्याला दुय्यम स्थान देऊन जात, धर्म, स्थानिक असंतोष व भावनिक मुद्दे घेऊन प्रचाराची राळ उठविली गेली. स्वबळावर नाहीतर सहकारी पक्षाच्या मदतीने “एनडीए’चे सरकार केंद्रात येणार असा प्राथमिक अंदाज आहे. अँटी इन्कंबन्सी व केलेल्या चुकांमुळे एनडीएला जरी बहुमत मिळाले नाही तरी अल्पमतात असूनही त्यांचेच सरकार अनेक पक्षांची मोट बांधून अस्तित्वात येईल. याचा आधार म्हणजे, येनकेनप्रकारेन सत्ता हस्तगत करणे हे उद्दिष्ट! याची झलक आपण गोवा विधानसभेच्या व उत्तर पूर्वेकडील काही छोट्या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत पाहिली आहे. कमी संख्येने पक्षाचे उमेदवार निवडून आले असतानाही सरकार भाजपचेच! ही स्थिती विरोधकांच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे. दूरगामी विचार करून विरोधकांनी त्वरित निर्णय व कृती करण्याची गरज आहे. लोकशाहीच्या सबलीकरणाच्यादृष्टीने विरोधीपक्ष मजबूत असणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे!

या निवडणुकीने एक गोष्ट पक्‍की केली ती म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी भाजपला कायमचा रामराम ठोकला! त्यामुळे देशभरातील विरोधी पक्षांतील नेत्यांमध्ये त्यांच्याबद्दल विश्‍वासाची भावना वाढीस लागेल व त्यातच त्यांनी “मी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत येथून पुढे असणार नाही,’ असे दिल्लीत निःक्षून सांगितले. त्यामुळे त्यांचे देशातील स्थान पंतप्रधान न होताही उंचावले आहे. त्यांच्यावर निष्ठा ठेवणारे व न ठेवणारे अशांची ओळख लोकसभेच्या तिकीट वाटपातूनच त्यांना झालेलीच आहे. आता आयाराम-गयारामची व्हायची ती बेरीज-वजाबाकी झालेली आहे. राष्ट्रवादीला एकसंध ठेवू शकेल, असा राज्यपातळीवरील सर्वमान्य नेता शरद पवार यांच्याशिवाय दुसरा डोळ्यासमोर येत नाही, हे तेही जाणून आहेत.

कॉंग्रेस पक्षाचा राज्यापुरता विचार करावयाचा झाल्यास त्यांच्याकडे कै. यशवंतराव चव्हाण, कै. वसंतदादा पाटील यांच्यासारखे लोकनेते दिसत नाहीत. अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण हे काही जिल्ह्यांपुरते नेते आहेत. त्यांचा प्रभाव संपूर्ण राज्यात पडेल असे नाही आणि तेही शह-काटशहाचे राजकारण करीत असतात. राज्यातील सारे निर्णय दिल्लीला घेतले जातात. ज्याचे वजन जास्त त्याच्या सोयीचे निर्णय, त्यामुळे दुसरा गट नाराज. अशा परिस्थितीत कॉंग्रेसची वाट अवघड दिसते. अकलूज, नगरची प्रतिष्ठित घराणी कॉंग्रेसला सोडून गेली. काही जाण्याच्या मार्गावर आहेत. लोकसभा निवडणूक निकालानंतर विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी पक्षाला आणखी गळती लागण्याची शक्‍यता आहे. परंतु जमेची बाजू म्हणजे कॉंग्रेस पक्ष सर्वसमावेशक आहे. कॉंग्रेस पक्ष धर्म, जात, पात याला धरून राजकारण करणारा नाही असा लोकांचा विश्‍वास आहे. त्याची पाळेमुळे सर्वदूर रुजलेली आहेत.

वरील सर्व बाबींचा कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने गंभीरपणे विचार करण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे. कॉंग्रेस नेतृत्वाने शरद पवारांना विश्‍वासात घेऊन त्यांना पुन्हा एकत्र येण्याचे-विलीनीकरणाचे आमंत्रण द्यावे व शरद पवारांनीही ते आमंत्रण कोणत्याही प्रकारचा विलंब न लावता स्वीकारावे! यातच दोन्ही पक्षांचे, कार्यकर्त्यांचे राज्याचे हित आहे. त्यासाठी शरद पवारांकडे महाराष्ट्र कॉंग्रेसची संपूर्ण कमान सोपवावी. पक्षबांधणीची जबाबदारी त्यांच्याकडे द्यावी व राज्यातील पक्ष संघटनेतील बदल, पदाचे वाटप योग्यता, चारित्र्य, लोकांचा पाठिंबा इ. पाहून ठरविण्याचे सर्वाधिकार त्यांच्यावर विश्‍वासाने सोपवावेत. दिल्लीने त्यात ढवळाढवळ करू नये! दोन वर्षांच्या कालावधीत पक्ष निश्‍चित सत्तेचा दावेदार बनेल!

शरद पवार यांचे इतरही पक्षांबरोबर, त्यांच्या नेतेमंडळीसोबत सलोख्याचे संबंध आहेत. कोकणात आपले अस्तित्व टिकवून असलेला शेकाप व स्थानिक आघाड्या यांनाही कॉंग्रेससोबत घेण्याचे प्रयत्न करता येतील. दलितांच्या विविध गटांना एकत्र करून, कार्यक्रमाच्या आधारे त्यांचा पाठिंबा मिळविता येईल. हे सर्व करण्यासाठी महाराष्ट्रातील कॉंग्रेसचे सूत्रसंचालक म्हणून शरद पवार हे योग्य व्यक्‍तिमत्त्व आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याची खडान्‌खडा माहिती, अगणित कार्यकर्त्यांना नावाने ओळखणारे, अफाट जनसंपर्क, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, केंद्रातील कृषी, संरक्षण मंत्री ही महत्त्वाची खाती सांभाळण्याचा दीर्घ अनुभव, सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची वृत्ती यांमुळे त्यांच्याशिवाय दुसरा नेता आतातरी दृष्टिक्षेपात नाही! या विलीनीकरणामुळे देशात शरद पवार यांची प्रतिष्ठा वाढेल, कॉंग्रेस राज्यात बळकट होईल, पक्षातील आयाराम-गयाराम यांना चाप बसेल, तरुण नेतृत्वाला आपले नेतृत्व गुण दाखविण्यास वाव मिळेल, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारेल, दोन्ही पक्षांनी लोकसभेच्या निवडणुका एकत्रित लढविल्यामुळे दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांमध्ये सामंजस्याचे संबंध प्रस्थापित होण्यास मदत झालेली आहे. ही वेळ विलीनीकरणास अनुकूल अशी आहे, असे म्हणता येईल.

शरद पवारांनी याकामी पुढाकार घ्यावा व कॉंग्रेसचे राज्यातील पुनरुत्थानाचे कार्य हाती घ्यावे. सत्तेपेक्षा महाराष्ट्र “त्यागाला’ जास्त महत्त्व देतो हे इतिहास सांगतो, नियतीने हे काम शरद पवारांवर सोपविले आहे, असे त्यांनी मानावे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)