पतसंस्था, बॅंकांनो.., एटीएम मशीन सांभाळा!

हवेलीच्या उपविभागीय अधिकारी डॉ. सई भोरे-पाटील यांनी सुरक्षिततेचे काढले आदेश

वाघोली -जिल्ह्यात बॅंकांचे एटीएम मशीन पळवून नेण्याच्या घटनेत वाढ होत आहे आणि अशा प्रकारच्या अनेक घटना अलीकडच्या काळात घडल्या आहेत. याबरोबरच बॅंक, पतपेढी आदी ठिकाणी दरोडा, चोरी असे प्रकार देखील घडलेले आहेत. त्या दृष्टीने बॅंका आणि पतपेढीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारी घेण्याबाबत हवेलीच्या उपविभागीय अधिकारी डॉ. सई भोरे-पाटील यांनी परिपत्रक काढले असून, याचे पालन करण्याचे आदेश बॅंका, पतपेढ्या आणि एटीएम व्यवस्थापकांना दिले आहेत.

या आदेशामध्ये म्हटले आहे की, बॅंकेत महत्त्वाचे ठिकाणी, तसेच दुकानांच्या बाहेरील परिसर आणि पार्किंग परिसर व रस्ता संपूर्णतः दिसेल अशा पद्धतीने कॅमेरे बसवून घ्यावेत. यापैकी काही कॅमेरे छुप्या पध्दतीचेही असावेत आणि याचा डीव्हीआर हा बॅंकेत अगर “एरीएम’मध्येच न ठेवता इतर गोपनीय ठिकाणी ठेवावा. या ठिकाणचे सर्व क्षणचित्रे हे डीव्हीआरमध्ये जतन होत असतानाच समांतररीत्या इतर दुसऱ्या ठिकाणी जतन होतील, अशी व्यवस्था करावी. आपले बॅंका, पतपेढी, एटीएम या ठिकाणी अंतर्गत आणि बाह्य विभागाचा परिसर सीसीटीव्हीमध्ये येणे आवश्‍यक आहे, तसेच अत्याधुनिक आलार्म आणि सायरन व्यवस्था बसवून घ्यावी, या भागात विद्युत पुरवठा योग्य असावा. याचे स्वीचबटन मॅनेजर, कॅशिअर आणि इतर महत्त्वाच्या कर्मचाऱ्यांच्या टेबलाजवळ, पायापाशी असावे.

या आदेशात पुढे म्हटले आहे की, बॅंका, पतपेढ्या एटीएमच्या सुरक्षिततेसाठी, तसेच ग्राहकांच्या सुरक्षेसाठी 24 तास अधिकृत सिक्‍युरिटी एजन्सीचे परवानाधारक शस्त्रधारी सुरक्षा रक्षक नेमावेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रतिकार करण्यासाठी असणारे स्प्रे किंवा इतर आवश्‍यक वस्तू ठेवणे गरजेचे आहे. बॅंका, पतपेढ्या, एटीएमजवळ अनोळखी एक अगर एकापेक्षा जास्त व्यक्ती विनाकारण थांबल्या असतील अगर रेंगाळत असतील तर त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवून संशय आल्यास जागरूकतेने तात्काळ पोलीस स्टेशनला संपर्क साधावा. रोख रक्कम ठेवताना तसेच ने-आण करताना विशेष काळजी घ्यावी. रक्कम ठेवण्यासाठी असलेली तिजोरी मजबूत असावी आणि योग्य पद्धतीने बसवलेली असावी. एटीएमचे शटर तिऱ्हाइत व्यक्ती बंद करू शकणार नाही, अशी व्यवस्था करावी. या ठिकाणी काचेवर कोणत्याही प्रकारच्या जाहिराती लावण्यास मनाई असावी.

पैसे काढणाऱ्या व्यक्तीला मागून येणारी व्यक्ती बघू शकणार नाही तसेच पैसे काढणारे व्यक्तीस त्याचे मागील येणारी व्यक्ती दिसेल अशी आरशाची व्यवस्था करावी. व्यवस्थापक व बॅंका, पतपेढी, एटीएम येथील फोन-मोबाइल क्रमांक पोलीस स्टेशनला व नजीकचे पोलीस दूरक्षेत्र येथे देण्यात यावा. असे आदेश उप-विभागीय पोलीस अधिकारी यांनी दिले आहेत.

सुरक्षा रक्षकाची वैयक्तिक माहिती आवश्‍यक
बॅंका, पतपेढी, एटीएम येथे काम करणारे कर्मचारी, सुरक्षा रक्षकांची परिपूर्ण माहिती, त्यांचे नातेवाईके, पूर्व इतिहास, पोलीस रेकॉर्ड आदींची माहिती घ्यावी. त्याचप्रमाणे एटीएममध्ये पैसे भरण्याकरीता नेमण्यात आलेली एजन्सीचे नाव व सोबत असलेले सिक्‍युरिटी एजन्सीचे नाव व संपर्क क्रमांक जवळच्या पोलीस स्टेशनला देण्यात यावेत. सध्या महाराष्ट्रात विषेशत: अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यात गॅस कटरने बॅंकेची तिजोरी फोडून रक्कम लुटण्याचे प्रकार घडलेले आहेत. त्यामुळे सुटीचे दिवशी तसेच रात्री बॅंकेत परवानाधारक सुरक्षा रक्षक नेमून विशेष लक्ष द्यावे.

सुरक्षिततेच्या बाबतीत उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचे पालन केल्याने जनतेचा पैसा सुरक्षित राहण्यास मदत होणार आहे
– प्रतापराव सातव, भैरवनाथ पतसंस्था, चेअरमन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)