भाजप काढणार 150 किमी पदयात्रा; पंतप्रधानांचा खासदारांना आदेश

नवी दिल्ली – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपासून ते लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीपर्यंत 150 किलोमीटरची पदयात्रा काढण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज खासदारांना दिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक बोलाविण्यात आली होती. यात संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह पक्षाचे बडे नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना मोदी म्हणाले की, ‘ भाजपच्या प्रत्येक खासदाराने 2 ऑक्‍टोबरपासून ते 31 ऑक्‍टोबरपर्यंत 150 किलोमीटरची पदयात्रा आपल्या भागात काढायची आहे. यात भाजपचे आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते सामील होतील. ही पदयात्रा एका दिवसात 15 किलोमीटर चालणार असून प्रत्येक बुथच्या परिसरातून गेली पाहिजे’, असे आदेश पंतप्रधानांनी यावेळी दिले.

संसदीय मंडळाच्या बैठकीत कर्नाटकसह विविध मुद्यांवर चर्चा झाली असल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली. पक्षाकडून आयोजित होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये सामील होण्याचे आवाहन लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांना केले.

या पदयात्रेतून महात्मा गांधींच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यात येणार आहे. तसेच, प्रत्येक बुथवर वृक्षारोपणही करण्यात येणार आहे. लोकसभेसह राज्यसभेच्या खासदारांनाही ही पदयात्रा करण्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, भाजपाच्या संसदीय दलाच्या बैठकीत विविध मुद्‌द्‌यांवर चर्चा झाल्याचे प्रल्हाद जोशी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)