मनगाभारा – उन्हाळी दुपार प्रतीक्षेतील (भाग १)

अरुणा सरनाईक 

निसर्गात अंत नाही. नव्यानं उमलत जाणं हा त्याचा निजधर्म आहे. लयाला जाऊन पुन्हा तेवढ्याच ताकदीनं उभं राहणं यालाच निसर्ग मानावं असं मला वाटतं. युगापासून सूर्याविषयीचे पृथ्वीचे आकर्षण याचे गुज एकदम उकलले आणि निसर्गाच्या विराटत्वाची ओळख नव्यानं पटली ती एका उन्हाळ्याच्या दुपारच्या सोसलेल्या तगमगीनंतर… एका कंटाळवाण्या प्रतीक्षेनंतर! दुपार कंटाळवाणी जरूर आहे, पण त्यातही एक शिकवण लपलेली आहे. आत्ममग्नता हा तिचा गुणधर्म तो ती आपल्याला शिकवते! आयुष्याचा लेखाजोखा विचारात घ्यायला भाग पाडते. प्रत्येक तुतील दुपार तुम्हाला वेगळा अनुभव देते. तो घ्यायला तुम्ही तयार असायला हवं! 

कशी असते दुपार! निशब्द, मंद! की रेंगाळणारी? तिला स्वत:ची एक गुढता असते. ऐन मध्यरात्री जर जाग आली आणि बाहेर खिडकीतून बघितले तर एक निःशब्दता सगळ्या वातावरणात भरून असते. पण ऐन मध्यरात्रीची निःशब्दता संगीतमय असते. तिला रातकिड्यांची, आकाशातल्या चांदणगीतांची,

पौर्णिमेच्या चंद्राची साथसंगत असते. आकाशातला भरपूर पाढंरा शुभ्र प्रकाश पाहून पहाट तर नाही झाली ना असा विचार करून सुरात तान मारणाऱ्या पाखरांची देखील तिला सोबत असते. उन्हाळ्यातील रात्रीला तर कडूलिंबाच्या कडूसर सुवासाची, मोगऱ्याच्या घनगर्द सुवासाची सोबत असते. पावसाळी रात्रीला मधुमालती प्राजक्‍त जाईजुई सोनचाफा यांची सोबत असते. सारे चैतन्यमय आभास सजीव असतात. वातावरणात बोलकी शांतता असते. सोबतीला आकाशातील मेघ गर्जना करीत असतात. कधी गंमत म्हणून वीजबाई आपला तोरा मिरवितात.

दुपार तशी नाही. ती लांबच लांब चालत जाणाऱ्या डाबंरी रस्त्यासारखी असते. गाई, म्हशीच्या मुखातील रवंथ करणाऱ्या घासासारखी असते. एक विचित्र दबलेली शांतता असते. उन्हाळ्यातल्या लांबलचक दुपारीला तर गरम झळांची निःशब्द झाडांच्या पानांची मख्ख साथ असते. साऱ्या वातावरणात एक थांबलेपणा, साचलेपणा असतो. दुपार नेहमीच कोरडी आणि कायम प्रतीक्षेत असल्यासारखी असते. निसर्गाप्रमाणे आपण देखील सारी दुपार प्रतीक्षेत असतो.

कधी वेळ टळून गेलेल्या आणि न आलेल्या कामवालीची वाट पाहतो, कधी पोष्टमनची तर कधी शाळेमधून अवेळी परतणाऱ्या मुलांची! कायम प्रतीक्षेत असते ही दुपार! जसा मध्यरात्रीचा भर एक ते तीनच्या दरम्यान असतो तशी दुपार ही देखील 1 ते 3 च्या वेळात भरात असते, तारुण्यात असते. पण मध्यरात्रीचं बहरतं तारुण्य सुखावह असतं दुपारचं बहरतं तारुण्य कंटाळवाणं असतं! कधी विचार केला, देवानं जे सृष्टीचं प्रहर बांधलेले आहेत त्यामागे त्याचा निश्‍चितच काही हेतू आहे. तशी ही दुपार कंटाळवाणी जरूर आहे. पण त्यातही एक शिकवण लपलेली आहे ती कधीतरी काहीतरी आपल्याला शिकवून जात असते. आत्ममग्नता हा तिचा गुणधर्म तो ती आपल्याला शिकवते! आयुष्याचा लेखाजोखा विचारात घ्यायला भाग पाडते. तशी प्रत्येक तुतील दुपार तुम्हाला वेगळा अनुभव देते. तो घ्यायला तुम्ही तयार असायला हवं!

सध्याचे दिवस उन्हाचे, सूर्यनारायणाच्या सळसळत्या तारुण्याचा प्रखर खुमार! कसा तेजाळ दिसतो एखाद्या कर्तृत्ववान योद्‌ध्यासारखा! सकाळचे म्हणण्यापेक्षा पहाटेचे काही कोवळे क्षण सोडले तर तो सारा दिवस दयामाया दाखवत नाही. शुभ्र चटकदार उन्हाचा वाढता कल्लोळ ऐन बाराच्या भरात अधिक्‍यानं भरून जात दुपारीकडे वाटचाल करतो. तेव्हा त्या उन्हाचं रौद्ररूप अति भयंकर होतं. ऑफिसच्या मोठमोठ्या काचेच्या खिडक्‍यांमधून समोर दिसणारा दुपारच्या वेळी काळ्या अजगरासारखा सुस्तावलेला डांबरी रस्ता डोळ्यांना साहवतं नाही. असं वाटतं रस्ता संपत नाही, की ही उन्हाळी दुपार संपत नाही. उष्ण श्‍वासाचं फुत्कार टाकणारा हा काळा डाबंरी अजगर ऐन दुपारी तुमच्या डोळ्यांना शिणवतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)