पुणे – लोकसभा निवडणुकीची मतमोजणी दि. 23 मे रोजी होणार आहे. या मतमोजणीच्या अनुषंगाने घ्यावयाची काळजी, कार्यपद्धती, मतमोजणीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने वेळोवेळी दिलेले आदेश आदींबाबतची माहिती राज्यातील सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देण्यात आली.
लोकसभा निवडणूक-2019 मतमोजणीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी राज्यातील जिल्हाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. गोरेगाव येथे मुंबई उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघाअंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या आदर्श मतमोजणी केंद्राला निवडणूक आयोगाचे अधिकारी तसेच राज्यातील जिल्हाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी भेट दिली. यावेळी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार, अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे, पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर आदी उपस्थित होते.
पुण्यातही प्रशिक्षण
मतमोजणीच्या प्रत्येक टेबलवर चार अधिकारी, कर्मचारी असणार आहेत. सूक्ष्म निरीक्षक, मतमोजणी पर्यवेक्षक, सहायक पर्यवेक्षक आणि एक शिपाई यांचा यात समावेश राहणार आहे. मतमोजणीच्या दिवशी कशा पद्धतीने कामकाज केले पाहिजे, मतमोजणी कशी करावी, त्याची माहिती अधिकाऱ्यांना किती वेळेत कोणत्या प्रकारे द्यावी, अर्ज भरून घ्यावे, अर्ज भरण्याची प्रक्रिया याचे प्रशिक्षण देण्यात आले. शिरूर मतदारसंघासाठीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी 200 पेक्षा अधिक अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. तर मावळ लोकसभा मतदारसंघासाठीच्या मतमोजणी अधिकारी कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी 256 अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. सोमवारी (दि.20) सूक्ष्म निरीक्षक यांना स्वतंत्र प्रशिक्षण आयोजित करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.