माणमध्ये 51 टक्के मतदान

कमी झालेला टक्का कुणाला तारणार ?

म्हसवड – माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपा व राष्ट्रवादी यांच्यात चुरशीची लढत असलेल्या माढा मतदार संघातील माण तालुक्‍यात 51 टक्के मतदान झाले असून म्हसवडमध्ये 55 टक्के झाले. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीपेक्षा यावेळेस मतदान कमी झाल्याने कमी झालेला मताचा टक्का राष्ट्रवादीला तारणार की भाजपला तारणार याची चर्चा माण तालुक्‍यात सुरू होती.

राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या माढा मतदार संघातील पळसावडे, ता. माण येथील रहिवासी व राज्याचे दुग्धमंत्री व पशूपालन मंत्री ना. महादेव जानकर यांनी पळसावडे येथे मातोश्रीसोबत मतदान केंद्रावर जावून मतदान केले. सकाळच्या सत्रात धिम्म्या गतीने मतदानाला सुरवात झाली. अकराच्या दरम्यान मतदान केंद्रावर रांगा लागल्या होत्या. कडक उन्हामुळे मतदान करण्यास मतदार बाहेर पडत नव्हते. त्यामुळे तालुक्‍यात 51% मतदान तर म्हसवडमध्ये 55 टक्के मतदान झाले. वयस्कर महिला पुरुष अपंग यांची मतदान केंद्रावर जाण्यासाठी व्हीलचेअरचा वापर प्रत्येक मतदान केंद्रावर करण्यात आला होता. त्यामुळे त्यांना मतदान व्यवस्थित करता आले. 99 वर्षांच्या ज्येष्ठ महिला नागरिक गोकुळा माने व 85 वर्षांच्या श्रीमती कवडे या वयोवृद्ध महिलांना मतदान केंद्रापर्यंत स्वयंसेवक गणेश म्हेत्रे राजू सरतापे नेत होते.

म्हसवड शहरात 14 मतदान केंद्रावर मतदान झाले. सिध्दनाथ हायस्कूलमध्ये पाच, प्राथमिक शाळा चार, बाजर पटांगण शाळा तीन ठिकाणी तर मासाळवाडी, विरकरवाडी, वरकुटे मलवडी, विरळी, जांभुळणी, पालवण, वडजल, कुकूडवाड, दिवड, दिडवाघवाडी, वाकी, वरकुटे-म्हसवड, रांजणी, पर्यंती, कारखेल, संभुखेड आदी ठिकाणी मतदान केंद्रावर शांततेत मतदान पार पडले. म्हसवड पोलिस पोलिस ठाण्याचे सपोनि मालोजीराव देशमुख व शहाजी गोसावी यांनी बंदोबस्तासाठी 100 पोलिस कर्मचारी व 80 होमगार्ड यांची नेमणूक प्रत्येक मतदान केंद्रावर केली होती. आज मतदाना दिवसीच लग्नाची मोठी तारीख असल्याने बाहेर गावी असलेल्या अनेकांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)