पोषण आहारातून तांदुळाची 25 टक्‍के कपात

ज्वारी, नाचणी, बाजरीच्या पाककृतीचा आहार मिळणार ः अलिबाग येथील बैठकीत विविध विषयांवर चर्चा

विद्यार्थ्यांना दर्जेदार आहार पुरविणार

विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात बदल भरण्याबाबतचा निर्णय शिक्षण परिषदेत घेण्यात आला आहे. दररोज तोच तोच आहार खाण्यासाठी विद्यार्थी उत्साह दाखवित नसल्याची बाब उघडकीस आली आहे. विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त दर्जेदार आहार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती प्रभारी प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी दिली आहे. 

पुणे – शासनाच्या शालेय पोषण आहार योजनेंतर्गत खिचडी भात खाऊन विद्यार्थी कंटाळले आहेत. त्यामुळे पोषण आहारातून तांदूळाची 25 टक्‍के कपात करण्यात आली आहे. आता विद्यार्थ्यांना ज्वारी, नाचणी, बाजरी यांच्या पाककृतीचा पौष्टीक आहार उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

शालेय पोषण आहार ही केंद्र शासन पुरस्कृत योजना आहे. राज्यातील 86 हजार 400 शाळांमधील 1 कोटी 10 लाख विद्यार्थ्यांना पोषण आहार योजनेचा लाभ दिला जातो. राज्यातील जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, डायटचे प्राचार्य यांच्या उपस्थित नुकतीच अलिबाग येथे शिक्षण परिषद घेण्यात आली.

शालेय शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिवही यावेळी उपस्थित होते. पोषण आहार योजनेवरील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. योजनेची आणखी प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी काही निर्णय या ठिकाणी घेण्यात आले असून त्याची अंमलबजावणीही तत्काळ सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यांनी तांदुळाच्या मागणीत कपात करून त्याऐवजी ज्वारी, नाचणी, बाजरी या धान्याची मागणी भारतीय अन्न महामंडळाकडे करावी.

या धान्याचा वापर करून विविध पदार्थ तयार करून ते विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय परिषदेत घेण्यात आला आहे. इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार पुरविण्यात येतो. मंजूर विद्यार्थी संख्येनुसार प्रतिविद्यार्थी प्रतिदिन अनुक्रमे 100 ग्रॅम व 150 ग्रॅम प्रमाणे तांदूळ अथवा इतर धान्य मंजूर करण्यात येते.

विद्यार्थ्यांच्या आहारात विविधता आणण्यासाठी आता बदल करण्यात आला आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीची तांदुळाची मागणी आधीच नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे ऑक्‍टोबर ते मार्च या कालावधीसाठी ज्वारी, नाचणी, बाजरी या धान्याची मागणी प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडे करावी, अशा सूचना प्रभारी प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी संबंधितांना केल्या आहेत.=

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)