पुण्यासाठी 1 लाख 4 हजार जागा; विज्ञान शाखेसाठी सर्वाधिक जागा

पुणे – पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रासाठी इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत यंदा 296 कनिष्ठ महाविद्यालयात विविध शाखांसाठी 1 लाख 4 हजार 139 प्रवेशाच्या जागा उपलब्ध झाल्या आहेत. यात सर्वाधिक 43 हजार 432 एवढ्या जागा विज्ञान शाखेसाठी असणार आहेत.

यंदा अकरावी प्रवेशासाठी पुणे विभागात 296 महाविद्यालयांनी दिलेल्या मुदतीत नोंदणी प्रक्रिया पूर्ण करुन कला, वाणिज्य, विज्ञान व एमसीव्हीसी या शाखांसाठी प्रवेशाच्या जागा उपलब्ध करून दिल्या आहेत. एकूण 741 शाखांमध्ये या जागा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना 27 मेपासून अर्जाचा भाग-1 भरण्याची सुविधा संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली होती. प्रवेशासाठी 18 जूनला वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर नुकतेच सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून आता 14 ऑगस्टपर्यंत प्रवेशाची अंतिम प्रक्रिया सुरु राहणार आहे.

चालू शैक्षणिक वर्षासाठी प्रवेशाकरिता उपलब्ध असलेल्या जागांची माहिती अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश नियंत्रण समिती अध्यक्ष मीनाक्षी राऊत यांनी दिली आहे. विज्ञान शाखेसाठी सर्वाधिक प्रवेश क्षमता दर्शविण्यात आली आहे. तर सर्वात कमी 2 हजार 945 प्रवेशाच्या जागा एमसीव्हीसी शाखेसाठी उपलब्ध झाल्या आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी प्रवेशासाठी आठ हजार जास्तीच्या जागा उपलब्ध झाल्या आहेत. यात 19 नामांकित महाविद्यालयात 10 टक्‍केप्रमाणे एकूण 1 हजार 431 प्रवेशाच्या वाढीव जागा शासनाने उपलब्ध करून दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)