कॅन्सर रुग्णांना दिलासा देणारे हॉस्पिटल : ऑन्को- लाईफ कॅन्सर सेंटर

कर्करोग हे नाव उच्चारले तरी माणसाचे मन भीतीने बावरून जाते. पण यात घाबरण्यासारखे काहीच नाही. वेळीच निदान झाले तर कॅन्सर बरा होऊ शकतो. उपचारांनी जगण्याचा आनंद वाढविता येऊ शकतो. साताऱ्यासारख्या ग्रामीण जिल्ह्यातही या आजारावरील अद्ययावत उपचाराची सुविधा ऑन्को- लाइफ कॅन्सर सेंटरद्वारे उपलब्ध झाली आहे. उपचाराबरोबरच कॅंन्सर होऊच नये आणि झालाच तर न घाबरता योग्य पद्धतीने सामोरे जाण्यासाठी जनजागृती करण्याचे महत्त्वपूर्ण काम उदय देशमुख यांच्या नेतृत्त्वाखाली या सेंटरमधून सुरू आहे.

मुंबईतील टाटा हॉस्पिटलनंतर कॅन्सरवर उपचार करणारे इतके अत्याधुनिक सुविधांनी युक्त हॉस्पिटल कुठेच नव्हते. हे लक्षात घेऊनच उदय देशमुख यांनी साताऱ्याजवळील शेंद्रे येथे हे सेंटर सुरू केले. कॅन्सरवरील उपचारात रेडिएशनचा उपचार असतो. हा उपचार करण्यासाठी जी मशिनरी लागते. त्या मशिन्सच्या उत्पादन करणाऱ्या जगातील एका मोठ्या कंपनीत श्री. देशमुख नोकरी करीत होते. जगभरात दरवर्षी कॅन्सरचे साडेतीन लाख रुग्ण आढळतात. दीड लाख लोकांचा मृत्यू होतो. भारतातही हा प्रश्न भेडसावू लागला होता. या आजाराचे गांभीर्य श्री. देशमुख यांच्या लक्षात आले. महाराष्ट्रात विशेषतः साताऱ्याच्या परिसरात या रुग्णांना दिलासा देण्याचे काम उभे करायचे त्यांनी ठरविले आणि त्यातूनच या सेंटरची उभारणी झाली. सर्जरी, रेडिएशन आणि केमोथेरपी हे तिन्ही उपचार या सेंटरमधून केले जातात. केवळ उपचार करून न थांबता आजार ज्यामुळे होऊ शकतो, त्या कारणांच्या निर्मूलनासाठी जनजागृतीचा मोठा प्रयत्न या सेंटरकडून होतो.

विविध प्रकारच्या तपासण्या, शिबिरे, विविध संस्थांच्या कार्यक्रमांतून तसेच संधी मिळेल त्या व्यासपीठावरून कर्करोगाविषयी जनजागृती करण्याची संधी हे सेंटर सोडत नाही. सातारा जिल्ह्यातील सर्व खेड्यांमध्ये सेंटरच्या टीमने जागृतीचा उपक्रम घेतला आहे. दीड हजारांहून अधिक महिलांची मोफत तपासणी केली आहे. तपासणीनंतर आवश्‍यकता भासल्यास उपचारांची मदत केली आहे. सेंटरमध्ये 24 तास सेवा उपलब्ध ठेवण्यात आली आहे. डॉ. मनोज लोखंडे, डॉ. करण चंचलानी, डॉ. सिद्धेश त्रिंबके या वैद्यकीय तज्ज्ञांसह टीम सुमारे दीडशे सहकारी कर्मचाऱ्यांसमवेत रुग्णांच्या सेवेसाठी तत्पर राहते. जगातील एक चांगेल हॉस्पिटल व्हावे म्हणून या सेंटरने आपल्या सेवेचे नियोजन केले आहे. सध्या सेंटरमध्ये 52 बेड आहेत. अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे आहेत. रोज सरासरी 25 हून अधिक रुग्णांची तपासणी होते. वर्षाकाठी शंभरहून अधिक शस्त्रक्रिया होतात. गरीब रुग्णांसाठी विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देत रुग्णावरील आर्थिक ताण कमी करण्यासाठीही सेंटर पुढाकार घेते.

कर्करोगाची भीती अनेकांच्या मनात असते. त्यामुळे शंका आली तरी डॉक्‍टरकडे जायचे नाही, अशी मानसिकता मोठ्या प्रमाणावर आढळते. कर्करोगाच्या पहिल्या स्टेजमध्येच लक्षात आले तर उपचाराने खूप काही करता येऊ शकते. परंतु हॉस्पिटलला येतच नसल्यामुळे दुसऱ्या तिसऱ्या स्टेजपर्यंत कर्करोग जातो. हे टाळण्याची आवश्‍यकता आहे. शरीरापेक्षाही मनाला झालेला या मानसिकतेचा कर्करोग दूर करणे आवश्‍यक आहे, असे डॉ. मनोज लोखंडे यांनी सांगितले. महाराष्ट्राच्या विशेषतः ग्रामीण भागात व्यसनांचे प्रमाण अधिक आहे. व्यसनापासून मुक्ती मिळवली तर कॅन्सरचे प्रमाण कमी येऊ शकते. त्यादृष्टीने सेंटरच्या वतीने जनजागृतीसाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न होतात. मूळ कारणावरच घाला घालणे आवश्‍यक आहे. कर्करोगावर उपचार करण्यापेक्षा तो होऊच नये, म्हणून प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे. जनजागृतीचे इतके उपक्रम राबविले जातात, परंतु आपणाला काही होत नाही, ही मानसिकता अनेकांच्या मनात असते. त्यामुळे ऐकायचे आणि सोडून द्यायचे ही प्रवृत्ती आपल्याकडे अधिक आहे. सुशिक्षित म्हणणारेही यात मागे नाहीत. जनजागृतीचा उपयोग चांगलाही होतो, असा अनुभव डॉ. लोखंडे यांनी सांगितला. रेडिओवरील एका कार्यक्रमातील त्यांचे एक वाक्‍य ऐकून शेतमजूर महिला त्यांच्याकडे आली. तपासणी झाली आणि तिला वेळेतच उपचार मिळाले. सध्या आपल्या देशात कॅन्सर तरूण झाला आहे, अशी स्थिती आहे. त्यावर मात करायची असेल तर मानसिकता बदलून सामोरे गेले पाहिजे. तसेच व्यसनांपासून दूर राहत कॅन्सर होऊच नये, म्हणून अधिक जागरूकता दाखविण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी सांगितले. उपचार आणि जनजागृती या दोन्हीद्वारे ऑन्को लाइफ कॅन्सर सेंटर या रुग्णांना दिलासा देण्यासाठी तत्पर राहत आहे. श्री. उदय देशमुख यांच्या नेतृत्त्वाखाली जबरदस्त टीम वर्क हे समाजातील मोठ्या समस्येविरूद्ध लढण्याचे काम सामाजिक बांधिलकीतून करीत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)